पाकिस्तानात पुन्हा रक्तरंजित मोहीम! खैबर पख्तूनख्वात लष्कराची तहरीक-ए-तालिबानवर मोठी कारवाई; ५५ हजार विस्थापित, लाखो लोक कर्फ्यूमध्ये कैद ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Operation Sarbakaf : दहशतवादाविरुद्धच्या मोहिमेत स्वतःच्या नागरिकांवर कारवाई करण्याची कुप्रसिद्ध परंपरा असलेल्या पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा खैबर पख्तूनख्वा प्रांताला रणांगण बनवले आहे. बाजौर जिल्ह्यातील लोई मामुंड आणि वार मामुंड तहसीलमध्ये तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) विरुद्ध मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई सुरू झाली आहे. या ऑपरेशनमुळे ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी घर सोडले असून, सुमारे ४ लाख लोक कठोर कर्फ्यूमुळे घरातच अडकले आहेत.
अहवालानुसार, अलीकडेच तालिबान कमांडर्ससोबत झालेल्या शांतता चर्चेला अपयश आल्याने २९ जुलै रोजी “ऑपरेशन सरबकाफ” पुन्हा सुरू करण्यात आले. चर्चेद्वारे दहशतवाद्यांना अफगाणिस्तानात पाठविण्याचा प्रयत्न झाला होता; परंतु सलग अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्यानंतर लष्कराने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला. या कारवाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने २७ संवेदनशील भागांमध्ये १२ ते ७२ तासांचा कर्फ्यू लागू केला आहे. परिणामी हजारो कुटुंबांचा अन्न, पाणी आणि औषधांच्या टंचाईचा सामना होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : India-US Relations: भारत-अमेरिका संबंधांमध्ये निर्णायक क्षण? जागतिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प भेटीची शक्यता
अवामी नॅशनल पार्टीचे खासदार निसार बाज यांनी खैबर पख्तूनख्वा विधानसभेत सरकारवर तीव्र आरोप केले. त्यांनी स्पष्ट केले की, “कर्फ्यूमुळे लाखो लोक घरातच कैद झाले आहेत. सुरक्षित ठिकाणी जाण्याचा मार्ग बंद आहे. विस्थापित नागरिकांसाठी सरकारकडे ना पुरेशी साधने आहेत ना नियोजन.” अनेकांना तंबूंमध्ये, तर काहींना सार्वजनिक इमारतींमध्ये रात्र काढावी लागत आहे. वाहतूक सुविधा ठप्प झाल्याने महिलां, लहान मुलां व वृद्धांचा त्रास प्रचंड वाढला आहे.
दरम्यान, सरकारी अधिकाऱ्यांचा दावा आहे की बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी नेले जात आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे सल्लागार मुबारक खान झैब यांनी सांगितले की, शाळांना तात्पुरते निवारे बनवण्यात आले असून, अन्न आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने खार तहसीलमधील १०७ शैक्षणिक संस्थांना मदत छावण्या म्हणून निश्चित केले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Missile Test : पुतिन-ट्रम्प बैठकीपूर्वी रशियाची अणुशक्तीची धमाकेदार चाचणी? ‘बुरेवेस्टनिक’मुळे जागतिक तणाव वाढणार
मानवाधिकार संघटनांच्या मते, दहशतवादविरोधी कारवाईच्या नावाखाली पाकिस्तानी लष्कर स्वतःच्या नागरिकांवर अन्याय करत असल्याचा इतिहास जुना आहे. खैबर पख्तूनख्वा, बलुचिस्तान आणि आदिवासी भागांमध्ये पूर्वीही अशा मोहीमांत हजारो लोक विस्थापित झाले होते. आज पुन्हा त्याच पद्धतीने ‘दहशतवाद निर्मूलन’च्या आड निरपराध नागरिकांवर संकट कोसळले आहे. एका बाजूला तालिबानच्या धमक्या आणि दुसऱ्या बाजूला लष्कराची कठोर कारवाई या दुहेरी टोकांमध्ये अडकलेले सामान्य नागरिक सुरक्षिततेसाठी संघर्ष करत आहेत.