World Museum Day 2025 The future of museums in rapidly changing communities
वैष्णवी सुळके / प्रगती करंबेळकर : सध्याचा काळ हा समाज, संस्कृती आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रचंड गतिमान आहे.त्यामुळे संग्रहालयातही आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने इतिहासाचे जतन आणि सादरीकरण अधिक सुलभ होत आहे. व्हर्च्युअल टूर, इंटरॅक्टिव्ह प्रदर्शनं आणि दस्तऐवजांच्या डिजिटलायझेशन झाल्यामुळे नव्या पिढीला आपला वारसा जवळून अनुभवता येतोय. डिजिटल क्रांती, हवामानातील बदल, जागतिकीकरण, स्थलांतर, लिंगसमतेचा मुद्दा, सामाजिक समावेश व इतर अनेक प्रश्न आजच्या समाजाला भेडसावत आहेत. अशा परिस्थितीत संग्रहालये ही केवळ ऐतिहासिक वस्तूंचे संग्राहक नसून, ती संवादाचे, समजूतदारीचे, इतिहासाच्या नव्या अर्थनिर्मितीचे आणि संस्कृतीचे जिवंत केंद्र बनत आहेत.
इतिहास,संस्कृती,परंपरा वस्तूंच्या माध्यमातून आपल्या डोळ्यापुढे उभ्या राहतात त्या संग्रहालयात. म्हणूनच इतिहासाची नव्याने जाणीव होऊन संपूर्ण कालपट उभा करण्याचे काम संग्रहालय करतात. म्हणूनच जगभरातील संग्रहालयांची सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक भूमिका अधोरेखित करण्यासाठी आजचा दिवस जागतिक संग्रहालय दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षीचा संग्रहालय दिन ‘वेगाने बदलणाऱ्या समुदायामध्ये संग्रहालयांचे भविष्य’ या संकल्पनेवर आधारित आहे. यामाध्यमातून संग्रहालयांची बदलत्या समाजातील भूमिका, तंत्रज्ञानाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि त्यांची वाढती गरज यावर प्रकाश टाकणारी आहे.
हे देखील वाचा : International Astronomy Day 2025: ‘या’ खास दिनानिमित्त जाणून घ्या खगोलशास्त्रातील 5 भारतीय अंतराळ चित्रपट कोणते?
बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाने मोठ्या प्रमाणात प्रगती केली, तंत्रज्ञानाच्या सहाय्याने संग्रहालयांंत नवनवीन प्रयोग केले जात आहेत. भौगोलिक सीमांच्या पलीकडे जाऊन आधुनिक संग्रहालय आता आभासी पद्धतीने जगभरातील प्रेक्षकांशी संवाद साधत आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने संग्रहालये आता ऑनलाइन प्रदर्शन, 3D वस्तु दर्शन,वेगवेगळे इंटरॅक्टिव्ह अॅप्स, व्हर्च्युअल रिऍलिटी आणि ऑगमेंटेड रिऍलिटी (AR) चा वापर करून अधिक व्यापक आणि सहभागी अनुभव देत आहेत. म्हणजेच संग्रहालयांना पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची जोड देऊन तरुण पिढीलाही अनुभवात्मक शिक्षण दिले जाते.
यामुळे कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय संग्रहालये शिक्षण आणि संस्कृतीच्या पोहचवणुकीचे माध्यम ठरत आहेत. असाच एक वेगळा उपक्रम राजा दिनकर केळकर संग्रहालयात आजपासून सुरू केली जाणार आहे. ही बहुभाषिक स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाईड सुविधा तेथील वस्तूंची माहिती मराठी, हिंदी, इंग्लिश भाषेत पर्यटकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.
‘वेगाने बदलणाऱ्या समुदायांमध्ये संग्रहालयांचे भविष्य’ या संकल्पनेचा मुख्य संदेश म्हणजे संग्रहालयांनी नवीन युगाशी जुळवून घेणे, सामाजिक जबाबदारी स्वीकारणे आणि टिकाऊ भवितव्याची वाटचाल करणे आहे. यासोबतच कार्बन फुटप्रिंट कमी करणाऱ्या तंत्रांचा वापर, हरित ऊर्जा वापर, स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन आणि लोकसंवाद वाढवणे या गोष्टी संग्रहालयांच्या नवनवीन उपक्रमांमध्ये दिसून येतात.
संग्रहालये ही केवळ भूतकाळाच्या आठवणी जपणारी स्थळे नसून, ती भविष्याचा विचार करणारी, समाजाशी संवाद साधणारी आणि सांस्कृतिक परिवर्तन घडवणारी संस्था आहेत. जेव्हा समुदाय वेगाने बदलतात, तेव्हा संग्रहालये त्यांचे दर्पण बनून नव्या पिढीला भूतकाळाचे ज्ञान, वर्तमानाचे भान आणि भविष्याची दिशा देतात.
संग्रहालयांचा खरा उद्देश म्हणजे भूतकाळाचे संवर्धन करताना, वर्तमानात समाजप्रबोधन करणे आणि उज्ज्वल भवितव्याची तयारी करणे हाच संदेश 2025 च्या जागतिक संग्रहालय दिनाची ही थीम आपल्याला देते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : दिएगो गार्सिया तळावर हल्ल्याची शक्यता; ट्रम्प यांच्या आदेशाने F-15 लढाऊ विमाने तैनात, लक्ष्य कोण?
केळकर संग्रहालयाची जोपासना चांगली इतर दुर्लक्षित का?
प्रत्येक संग्रहालयाचे स्वरूप वेगळे असते. काही संग्रहालयांना शासकिय अनुदान मिळते तर काही खासगी असतात. त्याचबरोबर बरीचशी संग्रहालये स्वबळावर चालत असतात. प्रत्येक संग्रहालयाची रचना आणि अर्थकारण वेगवेगळे असते. त्याआधारावर प्रत्येक संग्रहालयाची जोपासना केली जाते.
– – सुधन्वा रानडे ( केळकर संग्रहालय )
राजा दिनकर केळकर संग्रहालयाच्या निर्मितीची पार्श्वभूमी आणि संग्रहालयातील विविध दालनांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या दुर्मिळ वस्तूंची मराठी, हिंदी आणि इंग्रजी या ३ भाषांमध्ये सविस्तर माहिती संग्रहालयास भेट देणाऱ्या देश-विदेशातील पर्यटकांना मिळावी या हेतूने बहुभाषिक स्मार्ट डिजिटल ऑडिओ गाईड सुविधा सुरू केली जात आहे. तसेच यातून संग्रहालयाविषयी प्रेम, आदर भावना निर्माण होऊन सुखद आठवणी घेऊन पर्यटक जातील, आणि अधिक पर्यटक येथे येतील.