
world pneumonia day 2025 article about pneumonia and how to prevent it
न्यूमोनिया हा जगभरातील पाच वर्षांखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमुख संसर्गजन्य कारण आहे.
६५ वर्षांवरील वृद्ध, धूम्रपान करणारे आणि जुनाट आजार असलेले लोक यांना सर्वाधिक धोका असतो.
लसीकरण, स्वच्छता आणि आरोग्यदायी जीवनशैली हीच या प्राणघातक आजारापासूनची खरी ढाल आहे.
दरवर्षी १२ नोव्हेंबर रोजी जगभरात ‘जागतिक न्यूमोनिया दिन (World Pneumonia Day)’ साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश म्हणजे या गंभीर आणि प्राणघातक आजाराबाबत जागरूकता निर्माण करणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना लोकांपर्यंत पोहोचवणे.न्यूमोनिया हा फुफ्फुसांचा संसर्ग आहे जो जीवाणू, विषाणू किंवा बुरशीमुळे होऊ शकतो. हा संसर्ग फुफ्फुसांमधील लहान हवेच्या पिशव्या अल्व्हेओली मध्ये द्रव किंवा पू भरून श्वसनक्रियेत अडथळा निर्माण करतो. त्यामुळे रुग्णाला श्वास घ्यायला त्रास होतो, उच्च ताप, खोकला, आणि थकवा जाणवतो.
जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) आकडेवारीनुसार, पाच वर्षांखालील मुलांमध्ये न्यूमोनिया हा मृत्यूचे प्रमुख कारण ठरतो. दरवर्षी या आजारामुळे ७ लाखांहून अधिक मुले मृत्युमुखी पडतात, त्यात अंदाजे १.९ लाख नवजात बाळांचा समावेश असतो. नवजात बालकांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते, त्यामुळे ते सहजपणे या संसर्गाला बळी पडतात. याशिवाय, दूषित हवा, धूर, आणि स्वच्छतेचा अभाव हेदेखील प्रमुख कारणं ठरतात.
हे देखील वाचा : भारतीय डॉक्टर अन् नर्सला जगातिक स्तरावरुन मागणी! तरी देशातील आरोग्य सेवेचे मोडले कंबरडे
६५ वर्षांवरील वृद्धांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वयानुसार कमी होत जाते. त्यामुळे त्यांना संसर्ग पटकन होतो आणि बरे होण्यास जास्त वेळ लागतो.
त्याचप्रमाणे, मधुमेह, हृदयरोग, दमा, सीओपीडी (COPD) सारखे दीर्घकालीन आजार असलेले लोक किंवा एचआयव्ही/एड्स, कर्करोग यांसारख्या आजारांनी त्रस्त रुग्ण हेही अधिक संवेदनशील गटात येतात. धूम्रपान करणाऱ्यांनाही धोका प्रचंड असतो. तंबाखूचा धूर फुफ्फुसांतील ऊतींचे नुकसान करून रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
तज्ञांच्या मते, न्यूमोकोकल लस ही या आजारापासून संरक्षण देणारे सर्वात मोठे हत्यार आहे.
1. ६५ वर्षांवरील व्यक्तींनी आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी ही लस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावी.
2.दरवर्षी फ्लूची लस घेणेदेखील फायदेशीर ठरते, कारण फ्लूमुळे न्यूमोनियाचा धोका वाढतो.
लसीकरणासोबतच, संतुलित आहार, पुरेशी झोप, व्यायाम आणि प्रदूषणापासून बचाव यांचा अवलंब केल्यास संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
नियमितपणे हात धुणे ही सर्वात सोपी पण प्रभावी सवय आहे.
उच्च प्रदूषणाच्या काळात शक्यतो बाहेर जाणे टाळा.
बाहेर पडताना N95 किंवा N99 मास्क वापरा.
घरात एअर प्युरिफायरचा वापर करा.
आहारात व्हिटॅमिन C आणि झिंक असलेले पदार्थ जसे की लिंबूवर्गीय फळे, पपई, पालक, आणि बदाम यांचा समावेश करा.
या लहान सवयींनी तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय या प्राणघातक आजारापासून सुरक्षित राहू शकता.
हे देखील वाचा : World Science Day 2025 : जाणून घ्या कशी झाली या दिवसाची सुरुवात आणि काय आहे यंदाची थीम?
न्यूमोनिया हा केवळ संसर्गजन्य आजार नसून, तो जागतिक आरोग्य व्यवस्थेची मोठी कसोटी ठरतो.परंतु वेळेवर घेतलेली काळजी, योग्य लसीकरण आणि स्वच्छतेच्या सवयींमुळे आपण हा धोका मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो.या जागतिक न्यूमोनिया दिनानिमित्त, चला एक निश्चय करू स्वच्छता, लसीकरण आणि जागरूकता या त्रिसूत्रीचा अंगीकार करून प्रत्येक श्वास सुरक्षित बनवूया.