World Snake Day Snakes protect the environment know why they matter
World Snake Day 2025 : १६ जुलै रोजी दरवर्षी साजरा केला जाणारा ‘जागतिक सर्प दिन (World Snake Day)’ हा केवळ एक पर्यावरण विषयक दिवस नाही, तर तो आपल्या मानसिकतेतील खोल रुतलेल्या गैरसमजांवर प्रकाश टाकणारा आणि सापांविषयीचा दृष्टिकोन बदलणारा एक संधीसाधू क्षण आहे. साप म्हटलं की बहुतेक लोक घाबरतात, काहीजण लगेच ठार मारण्याचा विचार करतात. पण खरे पाहता, साप ही पृथ्वीवरील एक अत्यंत महत्त्वाची प्रजाती आहे, जी पर्यावरणीय समतोल राखण्यात आणि मानवी आरोग्यातही मोठे योगदान देते.
जगभरात सापांच्या ३,५०० हून अधिक प्रजाती आढळतात. त्यापैकी फक्त ६०० प्रजाती विषारी आहेत आणि त्यातही फक्त २०० प्रजातीच मानवासाठी घातक मानल्या जातात. म्हणजेच, ९० टक्क्यांपेक्षा जास्त साप निरुपद्रवी आहेत.
भारतात सुमारे ३०० पेक्षा अधिक सर्पप्रजाती असून त्यापैकी फारच थोड्या प्रजाती माणसांना धोका पोहोचवतात. तरीही भीतीपोटी अनेकदा निरुपद्रवी साप मारले जातात, जी एक पर्यावरणीय हानी ठरते.
येथे क्लिक करा : शिवभक्तांच्या श्रद्धेचं केंद्र; ऋषिकेशपासून थोड्याच अंतरावर आहे भगवान शिवाचे ‘हे’ चमत्कारिक मंदिर
साप नुसतेच ‘डरावणारे’ नाहीत, तर ते निसर्गातील अन्नसाखळीचे रक्षक आहेत. उंदीर, कीटक, छोटे प्राणी यांना नियंत्रित करत ते रोगराई आणि शेतीची हानी कमी करतात. उंदीर नियंत्रित झाल्यास पीकसंवर्धन होऊ शकते, ज्याचा शेतकऱ्यांनाही मोठा फायदा होतो. याशिवाय, साप हे स्वतःही शिकारी पक्ष्यांसाठी व मोठ्या प्राण्यांसाठी अन्न म्हणून काम करतात. त्यामुळे संतुलित परिसंस्था निर्माण करण्यात त्यांचे योगदान अनमोल आहे.
आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अनेक विषारी सापांच्या विषापासून बनवलेले औषधांचे घटक हृदयविकार, स्नायू विकार, आणि मुलांच्या न्यूरोलॉजिकल त्रासांमध्ये वापरले जातात. त्याचप्रमाणे सर्पविषावरून तयार केलेले एंटीव्हेनम सीरम हजारो लोकांचे प्राण वाचवते. म्हणजेच, ज्याच्यामुळे आपल्याला भीती वाटते, त्याच्याच विषातून औषध तयार होऊन आपला जीव वाचू शकतो ही निसर्गातील विस्मयकारक गोष्ट आहे.
१९७० च्या सुमारास टेक्सास (अमेरिका) येथील एका संस्थेने सापांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी पुढाकार घेतला. यानंतर पर्यावरणप्रेमी संस्था, कार्यकर्ते आणि संशोधक यांचाही यात सहभाग वाढला. शेवटी १६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ‘World Snake Day’ म्हणून मान्यता पावला. आज अनेक देशांमध्ये या दिवशी प्रदर्शन, शिबिरे, सर्पप्रदर्शन, शालेय स्पर्धा व वेबिनार्सच्या माध्यमातून सापांविषयी सकारात्मक जागरूकता पसरवली जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीशिवाय जीवन? खगोलशास्त्रात मोठा शोध; ‘TOI-1846b’ या प्राचीन ग्रहावर पाणी असल्याचे संकेत
पुढच्या वेळी तुम्हाला साप दिसला, तर घाबरू नका. तो तुमच्यावर हल्ला करणार नाही, जर तुम्ही त्याला त्रास दिला नाही. त्याचं अस्तित्व आपल्याला स्वच्छ परिसंस्था, रोगमुक्त शेती आणि वैद्यकीय प्रगती देतं. आजच्या या ‘जागतिक सर्प दिना’ला आपण ठरवूया की सापांविषयीची भीती झटकून टाकायची आणि निसर्गातील त्यांच्या स्थानाची जाणीव ठेवायची.