World Social Justice Day is celebrated to promote equality human rights and fair opportunities for all
नवी दिल्ली : दरवर्षी २० फेब्रुवारी रोजी जागतिक सामाजिक न्याय दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. सामाजिक अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, गरिबी, लिंगभेद, शारीरिक अपंगत्व, निरक्षरता आणि धार्मिक भेदभाव दूर करून सामाजिक एकात्मता साधण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
सामाजिक न्याय दिनाचा इतिहास आणि उद्देश
संयुक्त राष्ट्र महासभेने २६ नोव्हेंबर २००७ रोजी आपल्या ६२ व्या अधिवेशनात २० फेब्रुवारी हा दिवस जागतिक सामाजिक न्याय दिन म्हणून घोषित केला. त्यानुसार, २००९ साली प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) ने १० जून २००८ रोजी सामाजिक न्यायासाठी ILO घोषणापत्र स्वीकारले होते, जे जागतिक स्तरावर कामगार हक्क आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जाते.
सामाजिक न्याय म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला समान संधी मिळाव्यात, कोणत्याही प्रकारचे भेदभाव न करता प्रत्येकाला स्वतःच्या प्रगतीसाठी समान संधी प्राप्त व्हाव्यात, हा या दिनाचा मुख्य उद्देश आहे. विशेषतः गरिबी, सामाजिक व आर्थिक बहिष्कार, बेरोजगारी आणि शिक्षणातील असमानता यांसारख्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी हा दिवस प्रेरणादायी ठरतो.
सामाजिक न्याय दिनाच्या माध्यमातून जनजागृती
जागतिक स्तरावर या दिवसाच्या निमित्ताने विविध देशांमध्ये शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये सामाजिक न्यायासंबंधी कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये वर्गवृत्तपत्र, चर्चा सत्रे, चित्रपट प्रदर्शन, सामाजिक उपक्रम आणि जनजागृती मोहीम आयोजित करून विद्यार्थ्यांना सामाजिक अन्यायाविरोधात लढण्यासाठी प्रेरित केले जाते.
हा दिवस तरुणांना लिंग, वय, वंश, धर्म, संस्कृती, अपंगत्व आणि सामाजिक अन्याय यांसारख्या अडथळ्यांविरुद्ध आवाज उठवण्यास प्रवृत्त करतो. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना तसेच अनेक स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक गट या दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : हेच जगाच्या विनाशाचे संकेत? समुद्रातून वेदनेने तडफडत बाहेर आली दुर्मिळ डूम्सडे फिश, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल
जागतिक सामाजिक न्याय दिन थीम
दरवर्षी या दिवसासाठी एक ठराविक थीम निवडली जाते. २०२२ मध्ये “औपचारिक रोजगाराद्वारे सामाजिक न्याय मिळवणे” ही संकल्पना होती. तर २०२३ साली “सामाजिक न्यायासाठी अडथळ्यांवर मात करणे आणि संधी निर्माण करणे” ही थीम ठरविण्यात आली होती.
समाजहितासाठी महत्त्वाचा दिवस
जागतिक सामाजिक न्याय दिन हा एक सामाजिक सुधारणेचा दिवस असून, तो आपल्याला समतेच्या तत्त्वांना आत्मसात करण्यासाठी प्रेरित करतो. गरीब, वंचित, तसेच कोणत्याही प्रकारच्या अन्यायाला बळी पडलेल्या घटकांना न्याय मिळावा, यासाठी सरकारे आणि सामाजिक संस्था विविध उपाययोजना राबवतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘त्यांना गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकण्यात आल्या…’ व्हाईट हाऊसने शेअर केला ‘हा’ हृदयद्रावक व्हिडिओ
यामुळे, फक्त एक दिवस साजरा करण्यापुरता न राहता, सामाजिक न्यायाची मूल्ये प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने योगदान देणे आवश्यक आहे. समाजातील प्रत्येक घटकाने समान संधी मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध करावी, यासाठी सामाजिक न्यायाची संकल्पना अधिक दृढ करणे ही काळाची गरज आहे.