सुरत : गुजरात राज्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे केलेले भव्यदिव्य आयोजन पाहाता ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद मिळवण्याची आपली दावेदारी अधिक भक्कम झाली आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीश धनखड (Jagdish Dhankhad) यांनी केले. डायमंड आणि वस्त्रोद्योग क्षेत्राती सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुजरात राज्यातील सुरत या शहरात ३६व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा मोठ्या दिमाखदार रंगारंग सोहळ्यात बुधवारी समारोप झाला. समोराप सोहळ्यास भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भुपेंद्र भाई पटेल, क्रीडा मंत्री हर्ष संघवी, कॅबीनेट मंत्री मुकेश भाई पटेल, भारतीय ऑलिम्पिक महासंघाचे सरचिटणीस राजीव मेहता आदी मान्यवर उपस्थित होते.
उपराष्ट्रपती जगदीश धनखड म्हणाले की, ‘आजचा दिवस मी कधीही विसरू शकणार नाही. ऊर्जा व उत्साह हा सुरेख संगम असलेल्या या सोहळ्यास मी सहभागी होऊ शकलो. अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत गुजरातने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केले. याचे रहस्य मला जाणून घ्यायचे आहे. अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय विक्रम मोडले, नवे विक्रम निर्माण केले. ही खरोखरच एक शानदार उपलब्धी आहे. खेळाडू गेल्या काही वर्षांपासून या संधीच्या प्रतीक्षेत होते. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन पाहता भारताची ऑलिम्पिक यजमानपदाची दावेदारी भक्कम होणार आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघ चांगला खेळला. पण पदक जिंकता आले नाही. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंशी संवाद साधला, त्यांना घरी बोलावले. ही खरी आपली संस्कृती आहे. काही काळ आपण ही संस्कृती विसरलो होतो. या स्पर्धेतून खेळाडू निश्चितपणे चांगल्या आठवणी घेऊन जातील असा विश्वास व्यक्त करुन उपराष्ट्पती जगदीश धनखड यांनी पदक विजेत्यांचे अभिनंदन केले.
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पदक विजेत्या खेळाडूंचे कौतुक करताना ज्या खेळाडूंना पदक जिंकता आले नाही त्यांनी पुढील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदक जिंकण्याची ऊर्जा या ठिकाणाहून घेऊन जावी असे आवाहन केले. खेळाच्या माध्यमातून जीवनात नवे काही करण्याची ऊर्जा मिळते. खेळाडू हा कधीच पराभूत होत नाही. तो नव्या उमेदीने पुन्हा उभा राहातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खेळाचे एक चांगले वातावरण तयार केले आहे. पारंपारिक खेळांबरोबरच आधुनिक खेळांना देखील चालना मिळू लागली आहे. आधुनिक सुविधा, इन्फ्रास्ट्रश्चर उभे राहात आहेत. या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडले गेले. हे खेळाडू जगात भारताचा तिरंगा उंचावतील अशी आशा ओम बिर्ला यांनी व्यक्त केली.