मुंबई : भारताचा विस्फोटक फलंदाज आणि माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा आज त्याचा ३७ वा वाढदिवस साजरा करीत आहे. रॉबिन उथप्पाची फलंदाजी तसेच त्याचे विकेटकिपिंग मधील कौशल्य आजही भारतीय क्रिकेट चाहत्यांना भुरळ घालते. रॉबिन उथप्पाने १५ सप्टेंबर २०२२ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. उथप्पाच्या क्रिकेटमधील कारकिर्दीबद्दल सांगायचं झालं तर, त्याने भारतीय संघासाठी एकूण ४६ वनडे आणि १३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय संघाला आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धा जिंकून देण्यात रॉबिन उथप्पाने मोलाची भूमिका बजावली होती. तसेच देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये त्याने कर्नाटक आणि केरळ संघाचे प्रतिनिधित्व केले होते. या संघाचे प्रतिनिधित्व करताना त्याने ९ हजर पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. तब्बल २० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
२५ व्या वर्षी केले धर्मांतर :
आज माजी भारतीय क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाचा (रॉबिन उथप्पा वाढदिवस) वाढदिवस आहे. त्यांचा जन्म १९८५ मध्ये कर्नाटकातील कोडागु येथे झाला होता. रॉबिन उथप्पाच्या वडिलांचे नाव वेणू उथप्पा आहे. त्याच्या वडिलांनी आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धांमध्ये पंचांची भूमिका पारपाडली आहे. तसेच ते कर्नाटक हॉकी असोसिएशनचे अध्यक्ष देखील होते. वडिलांना हॉकीची आवड असताना देखील रॉबिनने क्रिकेटची वाट निवडली. रॉबिन उथप्पाचे वडील हिंदू आणि आई ख्रिश्चन आहे. वयाच्या २५ व्या वर्षापर्यंत तो हिंदू म्हणून राहिला. मात्र २०११ मध्ये त्याने ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. उथप्पासोबत त्याच्या बहिणीनेही ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
निवृत्तीची घोषणा करताना काय म्हणाला रॉबिन उथप्पा? :
रॉबिन उथप्पाने सोशल मीडियावर १५ सप्टेंबर रोजी एक भावूक पोस्ट लिहित निवृत्तीची घोषणा केली. आपल्या पोस्टमध्ये त्यानं देश आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणं माझ्यासाठी मोठा सन्मान असल्याचं म्हटल आहे. सोशल मीडियावरील पोस्टमध्ये रॉबिन उथप्पा म्हणतो, देशाचं आणि राज्याचं प्रतिनिधित्व करणे माझ्यासाठी मोठा सन्मान होय. प्रत्येक चांगल्या गोष्टीचा शेवट व्हायला हवाच. मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, मला पाठिंबा देणारे, बीसीसीआयचे अध्यक्ष, कर्मचारी, संघातील सहकारी, माझे प्रशिक्षक, आयपीएल संघ तसेच कर्नाटक क्रिकेट या सर्वांचे मी आभार मानतो., असे म्हंटले.