फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड : काल बांग्लादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये बांग्लादेशच्या संघाला २३ बॉल शिल्लक असताना ५ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला होता. बांगलादेश संघ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर पडला आहे. बांगलादेशला प्रथम भारताकडून आणि आता न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे संघ टॉप ४ च्या शर्यतीतून बाहेर पडला. संघाचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने पराभवाचे कारण स्पष्ट केले आणि आपल्या संघाच्या फलंदाजांवर तसेच क्षेत्ररक्षकांवर संताप व्यक्त केला. नझमुल हुसेन शांतो म्हणाला आहे की, आपण एकदिवसीय क्रिकेटमध्ये नियमितपणे ३०० धावा करत नाही आहोत.
बांगलादेश संघ न्यूझीलंडविरुद्ध २३६ धावा करू शकला. न्यूझीलंडने २३७ धावांचे लक्ष्य सहज गाठले. रावळपिंडीतील सपाट खेळपट्टीवरही बांगलादेशच्या फलंदाजांची कामगिरी खराब राहिली, कारण शॉट सिलेक्शन खराब होते, जास्त डॉट बॉल खेळले जात होते, फिरकी गोलंदाजांविरुद्ध नियोजनाचा अभाव होता आणि वेळेवर बाद न होणे हे कारण होते. कर्णधार शांतोने निश्चितच ११० चेंडूत ७७ धावा केल्या, तर झाकीर अलीने पुन्हा एकदा ४५ धावांची खेळी केली.
A clinical performance from the Black Caps as they secured their spot in the semi-finals with a win over Bangladesh 👏#BANvNZ pic.twitter.com/2rPvMyE3zP
— ICC (@ICC) February 24, 2025
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत नझमुल हुसेन शांतो म्हणाला की, “कर्णधार म्हणून हे खरोखर निराशाजनक आहे. मला वाटते की आपल्याला फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. मी अनेकदा सांगितले आहे की आपल्याला फलंदाजी युनिट म्हणून खूप सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, परंतु आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका केल्या. आपल्याला आपली फलंदाजी सुधारण्यावर लक्ष केंद्रित करावे लागेल. मला आशा आहे की या स्पर्धेनंतर आपण फलंदाजी युनिट म्हणून काही बदल करू आणि वेगवेगळ्या मार्गांचा विचार करू आणि आपली फलंदाजी सुधारण्याचा प्रयत्न करू.”
तो कोणत्या प्रकारच्या बदलांबद्दल बोलत आहे असे विचारले असता, शांतो यांनी खेळाडूंमध्ये बदल नसून त्यांच्या विचारसरणीत आणि कार्यप्रणालीत बदल व्हायला हवा यावर भर दिला. तो म्हणाला, “खेळाडूंमध्ये बदल होईल असे माझे म्हणणे नव्हते. मला वाटते की आपल्याला आपली विचारप्रक्रिया बदलण्याची गरज आहे. फलंदाजी करताना आपल्याला अधिक जबाबदारी घेण्याची गरज आहे, जेणेकरून आपण संघात अधिक योगदान देऊ शकू.”
आता बांग्लादेशचा पुढील सामना पाकिस्तानविरुद्ध असणार आहे. बांग्लादेशने स्पर्धेमध्ये एकही सामना जिंकलेला नाही तर पाकिस्तानचीही अशीच स्थिती आहे. चॅम्पियन ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे पण त्यांनी दोन्ही सामन्यांमध्ये खराब कामगिरीमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.