
Big Bash League Melbourne Stars Captain Glenn Maxwell has been Stripped of His Captaincy Marcus Stoinis has been Made Permanent Captain
Big Bash League Melbourne Stars Captain : बिग बॅश लीगच्या इतिहासात तीन वेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या मेलबर्न स्टार्सने अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसची नवीन कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या हंगामाच्या समाप्तीनंतर कर्णधारपद सोडलेल्या ग्लेन मॅक्सवेलची जागा त्याने घेतली आहे. स्टॉइनिस आता मेलबर्न स्टार्सचा सातवा कायमस्वरूपी कर्णधार बनणार आहे. स्टॉइनिस त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी जगभरात प्रसिद्ध असून कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्याबद्दल त्याने आनंदही व्यक्त केला आहे.
मेलबर्न स्टार्सचे कर्णधारपद मिळाल्यावर मार्कस स्टॉइनिस म्हणाला, गेल्या वर्षी ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत मला एका सामन्याचे कर्णधारपद भूषवण्याचा बहुमान मिळाला होता. मला ती संधी खूप आवडली. आता पूर्णवेळ कर्णधारपदाची जबाबदारी मिळणे ही सन्मानाची गोष्ट आहे. स्टोइनिस गेल्या 10 वर्षांपासून मेलबर्न स्टार्सकडून खेळत आहे आणि त्याच्या बिग बॅश लीग करिअरमध्ये त्याने 2,666 धावा करण्यासोबतच 39 विकेट्सही घेतल्या आहेत. आगामी हंगामात तो संघाला चांगल्या दिशेने नेईल, अशी आशा स्टॉइनिसला आहे.
स्टॉइनिसने आतापर्यंत स्टार्ससाठी 98 सामने खेळले आहेत आणि दोन सामने खेळल्यानंतर या संघासाठी 100 किंवा त्याहून अधिक सामने खेळणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. बिग बॅश लीगचा पुढील हंगाम 15 डिसेंबरपासून सुरू होत असून लीगची सुरुवात मेलबर्न स्टार्सच्या सामन्याने होणार आहे. ज्यामध्ये त्यांचा सामना पर्थ स्कॉचर्सशी होणार आहे. एकीकडे मेलबर्न स्टार्सच्या संघ व्यवस्थापनाने ग्लेन मॅक्सवेलचे कौतुक केले, तर दुसरीकडे स्टॉइनिसकडून खूप अपेक्षा व्यक्त केल्या.
आयपीएलमध्ये पंजाब किंग्जकडून खेळणार
मार्कस स्टॉइनिस हा IPL च्या मागील तीन हंगामात लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळला आहे. पण यावेळी मेगा लिलावात पंजाब किंग्जने त्याला 11 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. स्टोइनिस याआधी 2016-2018 मध्ये पंजाबकडून खेळला होता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्लेन मॅक्सवेलही पंजाब किंग्जमध्ये पुनरागमन करणार आहे. आता मेलबर्न स्टार्सप्रमाणे पंजाबही स्टॉइनिसला आयपीएल २०२५ साठी कर्णधार म्हणून नियुक्त करणार का हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. श्रेयस अय्यर देखील या संघात आहे, जो लिलावात 26.75 कोटी रुपयांना विकला गेला.