Duleep Trophy 2025: Danish Malewar creates history! Becomes the first Indian player to do so
Duleep Trophy 2025 : दुलीप ट्रॉफीला २८ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत मध्य विभाग आणि नॉर्थ ईस्ट विभाग यांच्यात क्वार्टर फायनल सामना खेळवण्यात येत आहे. या सामन्यात दानिश मालेवारने मध्य विभागाकडून खेळताना नॉर्थ ईस्ट विभागाविरुद्ध २०३ धावा करून धुमाकूळ घातला आहे. या सामन्यात विदर्भाचा फलंदाज दानिश मालेवारने दुलीप ट्रॉफीमध्ये द्विशतक झळकवून आपली प्रतिभा दाखवून दिली आहे. तसेच त्याने या सोबत आपल्या नावावर एक मोठा विक्रम केला. सेंट्रल झोनकडून खेळणाऱ्या दानिश मालेवारने २०३ धावा केल्यानंतर तो निवृत्त झाला. ८१ वर्षांनंतर द्विशतक झळकावून निवृत्त होणारा दानिश हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.
दानिश मालेवारने नॉर्थ ईस्ट झोनविरुद्ध २२२ चेंडूंचा सामना करत २०३ शानदार धावा केल्या आहेत. त्यानंतर त्याने निवृत्ती घेतली. दानिश मालेवारपूर्वी १९४४ मध्ये माजी भारतीय फलंदाज विजय मर्चंट यांनी असा पराक्रम केला आहे. क्रिकेट क्लब ऑफ इंडियाकडून सर्व्हिसेस इलेव्हनविरुद्ध २०१ धावा करून विजय मर्चंट यांनी निवृत्ती घेतली होती.
हेही वाचा : BWF World Championships : PV Sindhu चे स्वप्नभंग! क्वार्टरफायनलमध्ये इंडोनेशियाच्या कुसुमा वारदानीकडून पराभव
खराब प्रकाश आणि पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. त्यावेळी मालेवार १९८ धावांवर नाबाद होता, त्याने या खेळीसह मागील रणजी ट्रॉफी फायनलमध्ये १५३ धावांची त्याची मागील सर्वोत्तम धावसंख्या देखील मोडीत काढली. शुक्रवारी सकाळी खेळ पुन्हा सुरू झाला तेव्हा, मालेवारने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीत पहिल्यांदाच द्विशतक ठोकले. यासोबत त्याने ८१ वर्षांनंतर एक विशेष कामगिरी देखील केली आहे.
भारतीय देशांतर्गत संघांदरम्यान खेळवण्यात आलेल्या सामन्यात शेवटचा खेळाडू १९९६-९७ च्या रणजी ट्रॉफीमध्ये निवृत्त झाला होता. उत्तर प्रदेशचा यष्टीरक्षक मनोज मुदगलने जयपूरमध्ये राजस्थानविरुद्ध हा पराक्रम केला होता.
या यादीत द्विशतक ठोकल्यानंतर स्वतःला निवृत्त बाद करणाऱ्या काही प्रमुख फलंदाजांचा देखील समावेश आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू गोगुमल किशनचंद यांनी १९४३-४४ मध्ये सीके नायडू इलेव्हनकडून डीबी देवधर इलेव्हनविरुद्ध खेळताना २०४ धावा फटकावल्या होत्या. श्रीलंकेच्या अरविंद डी सिल्वाने १९९४-९५ मध्ये माशोनलँड कंट्री डिस्ट्रिक्ट्सविरुद्ध खेळताना २०२ धावा केल्या होत्या, तर त्याचा सहकारी मारवन अटापट्टूने २००१-०२ मध्ये बांगलादेशविरुद्ध २०१ धावा काढल्या होत्या. या सर्व फलंदाजांनी द्विशतक झळकवल्यानंतर निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता.