
IND W vs SL W: Shafali Verma is on the verge of a world record! History will be made as soon as she scores 75 runs against Sri Lanka.
Shafali Verma will create a world record : भारतीय महिला संघ आणि श्रीलंकेच्या महिला संघ यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळी जात आहे. या मालिकेतील चार सामने भारताने जिंकून मालिका ४-० जिंकली आहे. या मालिकेतील पाचवा सामना आज, ३० डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय महिला संघाची सलामीवीर शफाली वर्मा एक मोठा टप्पा गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. जर तिने पाचव्या सामन्यात ७५ धावा काढल्या तर ती एका मालिकेत महिला खेळाडूसाठी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनणार आहे.
२१ वर्षीय हरियाणाची फलंदाज शफाली वर्माने चार सामन्यांमध्ये एकूण २३६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये तीन अर्धशतकांचा समावेश आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. २१ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तीला फक्त ९ धावाच करता आल्या होत्या, परंतु पुढील तीन सामन्यांमध्ये शेफालीने ६९*, ७९* आणि ७९ धावा फटकावल्या होत्या.
शेफालीला हीली मॅथ्यूजचा विक्रम मोडण्यासाठी पाचव्या सामन्यात ७५ धावांची आवश्यकता आहे. जर शेफाली वर्माने ७५ धावा केल्या तर ती महिला क्रिकेटमध्ये टी२० मालिकेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज बनू शकते. सध्या हा विक्रम हीली मॅथ्यूजच्या नावावर जमा आहे. मॅथ्यूजने २०२३ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत ३१० धावा फटकावल्या आहेत.
हेही वाचा : पाकिस्तान क्रिकेटमध्ये भूकंप! PCB ने कसोटी संघाचे मुख्य प्रशिक्षक अझहर महमूद यांना दिला नारळ
आतापर्यंत, फक्त तीन फलंदाजांनी टी२० मालिकेत ३०० धावांचा टप्पा ओलांडता आला आहे. वेस्ट इंडिजची हीली मॅथ्यूज तीन सामन्यांमध्ये ३१० धावा करून यादीत अव्वल स्थानी आहे. तर या यादीत चामारी अटापट्टू दुसऱ्या क्रमांकावर आहे. अटापट्टूने पाच सामन्यांच्या मालिकेत ३०४ धावा केल्या आहेत. अर्जेंटिनाची मारिया कॅस्टिनेरास ३०० धावांसह मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तिने २०२३ मध्ये ही किमया साधली होती.