Action against Shoaib Akhtar! India took 'this' tough decision after Pahalgam Terrorist Attack...
Pahalgam Terrorist Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्याने भारताला चांगला हादरा बसला आहे. सर्व स्तरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भारताने कठोर निर्णय घेत पाकिस्तानविरोधात आघडी उघडली आहे. त्यानंतर पाकिस्ताननेही भारताविरुद्ध पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव खूप वाढलेला दिसत आहे. अशा परिस्थितीत भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध आणखी एक कारवाई केली आहे. भारत सरकारकडून देशातील अनेक पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयानंतर, अनेक पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे यूट्यूब चॅनेल आता भारतात बघता येणार नाहीत. शोएब अख्तर, आरजू काझमी आणि सय्यद मुझम्मिल शाह यांसारख्या पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत सरकारने केलेल्या कारवाईनंतर, जेव्हा यूट्यूबवर पाकिस्तानी चॅनेल शोधताना काही मजकूर लिहिला जात आहे. तेव्हा असे लिहिलेळे समोर येते की, ‘राष्ट्रीय सुरक्षा किंवा सार्वजनिक सुव्यवस्थेशी संबंधित सरकारच्या आदेशामुळे ही सामग्री सध्या या देशात उपलब्ध नाही. सरकारी काढून टाकण्याच्या विनंत्यांबद्दल अधिक माहितीसाठी, कृपया गुगल ट्रान्सपरन्सी रिपोर्ट (transparencyreport.google.com) ला भेट द्या.’
तसेच काही पाकिस्तानी न्यूज चॅनेलच्या यूट्यूब पेजवर देखील भारतात बंदी घातली आहे. यामध्ये समा टीव्ही, जिओ न्यूज, डॉन न्यूज, बोल न्यूज सारख्या अनेक चॅनेलचा समावेश आहे.
गृह मंत्रालयाने केलेल्या शिफारशींनुसार, भारत सरकारकडून पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी घालण्यात आली आहे. लष्कर आणि सुरक्षा एजन्सींविरुद्ध प्रक्षोभक, खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने आणि चुकीची माहिती पसरवण्याविरुद्ध कारवाई करण्यत आली आहे.