Asian Athletics: Tricolour wins in South Korea! India wins gold in 4x400m medley relay; Watch Video
Asian Athletics : आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताने आपला दबदबा कायम राखला आहे. भारताने या स्पर्धेत इतिहास रचला आहे. भारतीय अॅथलेटिक्स संघाने ४x४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई करत आपले जेतेपद कायम राखले आहे. भारतीय रिले संघाने जबरदस्त समन्वय आणि वेग साधत ३:१८.१२ सेकंदात शर्यत पूर्ण केली आणि सर्वांना मागे सोडले.
भारतीय संघाकडून रूपल चौधरी, विशाल टीके, संतोष कुमार तमिलारासन आणि शुभा वेंकटेशन यांनी शानदार कामगिरी केली. चारही धावपटूंनी उत्तम टीमवर्क दाखवले आणि सुरुवातीपासूनच भारताला शर्यतीत टिकवून ठेवले. ज्याचा परिणाम भारताच्या सुवर्ण कामगिरीत झाला आहे. यापूर्वी देखील भारताने या खेळात सुवर्णपदक जिंकले होते.
शर्यत संतोष कुमारकडून सुरवात करण्यात आली. त्याने वेगवान सुरुवात केली आणि भारताला आघाडी मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावली. त्यानंतर, त्याने रूपल चौधरीकडे बॅटन सोपवले, जी चिनी धावपटूकडून कठीण स्पर्धेचा सामना करत होती. रुपलने तिच्या चालीत संयम ठेवला आणि आघाडी कायम राखत विशाल टीकेला बॅटन दिला.
विशाल सुरुवातीला दबावाचा सामना करत असल्याचे दिसले. नंतर त्याने वेग वाढवला आणि भारताची आघाडी मजबूत केली. शेवटच्या टप्प्यात धावणाऱ्या शुभा वेंकटेसनने जबरदस्त संतुलन आणि वेग राखत शानदार पद्धतीने शर्यत पूर्ण केली आणि सुवर्णपदकाला गवसणी घातली. ज्याचा व्हिडिओ देखील आता वेगाने व्हायरल होत आहे.
भारतीय संघाने ही शर्यत ३:१८.१२ सेकंदात पूर्ण केली, जी या हंगामातील त्यांची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. त्यांनी चीनला हरवून सुवर्णपदकाला गवसणी घातली. या शर्यतीत चीनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चीनने ३:२०.५२ सेकंदात शर्यत पूर्ण करून रौप्यपदकावर नाव कोरले. त्याच वेळी, श्रीलंका या यादीत तिसऱ्या स्थानावर राहिला. श्रीलंकेने ३:२१.९५ सेकंदात शर्यत पूर्ण करून कांस्यपदकाला गवसणी घातली.
🚨 INDIA’S MIXED RELAY TEAM WINS GOLD 🥇
– Incredible Performance in 4x400m , 2nd Gold for India in Asian Athletics Championship 🏆 pic.twitter.com/LCn8m4CKwp
— The Khel India (@TheKhelIndia) May 28, 2025
हेही वाचा : IND Vs END : इंग्लंड दौऱ्यात Shreyas Iyer ला स्थान नाही, Gautam Gambhir ने चार शब्दांत संपवला विषय…
या विजयासह, भारताने ४×४०० मीटर मिश्र रिले स्पर्धेत तिसऱ्या पदकाला गावसणी घातली. २०१९ मध्ये जेव्हा या स्पर्धेचा पहिल्यांदाच चॅम्पियनशिपमध्ये समावेश करण्यात आला तेव्हा भारताने रौप्य पदकावर नाव कोरले होते. २०२३ मध्ये, भारताने पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकून मोठा इतिहास रचला होता. आता २०२५ मध्ये देखील भारताने सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला आहे.