
अहमदाबाद : सध्या गुजरात येथे राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे (National Games 2022) आयोजन करण्यात आले असून यात विविध ३६ खेळ प्रकारात ७ हजार हुन अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडू पदकांची लयलूट करीत असून राष्ट्रीय स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळवत आहेत. अशातच राष्ट्रकुल स्पर्धेतील सहभागी भारतीय संघाची सदस्य खेळाडू मयुरी लुटेने (Mayuri Lute) राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये दमदार पदार्पण करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे.
मयुरी लुटेने ही महाराष्ट्रातील खेळाडू असून तिने सोमवारी टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. आंतरराष्ट्रीय सायकलिस्ट मयुरी लुटे, शशिकला आगाशे आणि आदिती डोंगरे यांनी टीम स्प्रिंट प्रकारात सुवर्णपदक पटकावले. या पदकासह महाराष्ट्राच्या नावे सायकलिंगमध्ये तिसऱ्या पदकाची नोंद झाली.
सायकलिंगमधील थ्री लॅपच्या या प्रकारात महाराष्ट्र संघाने ५०३ गुणांची कमाई केली आहे. मयुरीने स्पर्धेत तिसरे पदक आपल्या नावावर केले असून आता तिच्या नावे वैयक्तिक दोन पदकांसह एका सांघिक पदकाचा समावेश आहे. यापूर्वी तिने दोन सुवर्ण आणि ब्राँझपदक जिंकले आहे.