फोटो सौजन्य - Mumbai Indians सोशल मीडिया
WPL Points Table : महिला प्रीमियर लीग सध्या शेवटच्या टप्प्यात आहे, त्यामुळे आता लवकरच हा तिसरा सिझन संपणार आहे. काल या सीझनचा १९ वा सामना पार पडला. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला. या सामन्यांमध्ये मुंबई इंडिअन्सच्या संघाने गुजरात जायंट्सला ९ धावांनी पराभूत केले. यामध्ये मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी कमालीची कामगिरी करून दाखवली. यापैकी २ संघांचे सर्व सामने पूर्ण झाले आहेत, परंतु मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात अजूनही १-१ लीग सामना शिल्लक आहे.
महिला प्रीमियर लीग २०२५ चा शेवटचा लीग सामना आज मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकून, मुंबई इंडियन्स संघ महिला प्रीमियर लीगच्या अंतिम फेरीत थेट स्थान निश्चित करू इच्छितो. सध्या दिल्ली कॅपिटल्सचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. दिल्ली कॅपिटल्सने ८ पैकी ५ सामने जिंकले आणि ३ मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दिल्लीचे सध्या १० गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +०.३९६ आहे. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा संघ पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईने या स्पर्धेत आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत आणि २ सामने गमावले आहेत.
मुंबईचे सध्या १० गुण आहेत आणि त्यांचा नेट रन रेट +०.२९८ आहे. जर मुंबई इंडियन्स संघाने आजचा आरसीबी विरुद्धचा सामना जिंकला तर तो थेट पॉइंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर पोहोचेल. पहिल्या क्रमांकावर येणे म्हणजे मुंबई इंडियन्सचा अंतिम फेरीत प्रवेश. पॉइंट्स टेबलमध्ये पहिला क्रमांक पटकावणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. तर एलिमिनेशन सामना दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या संघांमध्ये खेळला जाईल. गुजरात जायंट्स संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. आता एलिमिनेटर सामन्यात गुजरात कोणत्या संघाचा सामना करेल हे पाहणे बाकी आहे. गतविजेते आरसीबी आणि यूपी वॉरियर्स महिला प्रीमियर लीगमधून आधीच बाहेर पडले आहेत.
कालच्या सामन्यांमध्ये मुंबई इंडिअन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने अर्धशतक ठोकले तर नॅट सायव्हर ब्रंटने ३८ धावांची खेळी खेळली. त्याचबरोबर शानदार गोलंदाजीने अमेलिया केर हिने ३ विकेट घेतले हेली मॅथ्यूज आणि शबनीम इस्माइल यांनी प्रत्येकी दोन विकेट संघासाठी घेतले.