फोटो सौजन्य - सोशल मीडिया
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये नुकतीच दोन सामान्यांची T20 मालिका पार पडली. या मालिकेचा शेवटचा सामना १० नोव्हेंबर रोजी झाला. या सामन्याचे आयोजन डंबुला येथील रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर करण्यात आले होते. दुसरा T20 सामना जिंकून श्रीलंका मालिका जिंकणार होता, पण न्यूझीलंडने हा सामना जिंकून मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. श्रीलंकेला 109 धावांसारख्या छोट्या लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. ग्लेन फिलिप्सने न्यूझीलंडच्या या छोट्या धावसंख्येचा बचाव करण्यात मोठे योगदान दिले. अखेरच्या षटकात त्याने श्रीलंकेला 8 धावाही करू दिल्या नाहीत. फिलिप्सनेही शेवटच्या षटकात श्रीलंकेचे तीन बळी घेतले.
शेवटच्या षटकात फिलिप्सने श्रीलंकेकडून विजयाचा घास हिसकावून घेतला. न्यूझीलंडने फिलिप्सकडे ओव्हर टाकण्यासाठी चेंडू सोपवला. पहिल्या चेंडूवर सिंगल आला. दुसऱ्या चेंडूवर निसांकाने विजयाच्या इराद्याने मोठा शॉट खेळला, पण लाँग ऑनवर तो झेलबाद झाला. यानंतर तिसऱ्या चेंडूवर पाथिरानाही यष्टीचीत झाला. आता श्रीलंकेला दोन चेंडूत 6 धावांची गरज होती. महिष तिक्षनाने चौथ्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडूची केवळ किनार लागली आणि यष्टिरक्षक मिशेलने त्याचा झेल घेतला, त्यामुळे न्यूझीलंडने हा सामना ५ धावांनी जिंकला.
हेदेखील वाचा – IND VS SA : मालिकेत बरोबरी! साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाला 3 विकेट्सने केलं पराभूत
दुसरा T20 सामना ॲक्शनने भरलेला होता, पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेने दुसऱ्या सामन्यात आत्मविश्वासाने प्रवेश केला आणि नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत नुवान तुषाराने सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर न्यूझीलंडचा सलामीवीर टिम रॉबिन्सनला यॉर्करने क्लीन बोल्ड केले.
न्यूझीलंडचा डाव अडचणीत आला आणि पॉवरप्लेमध्येच त्यांनी 33 धावांत दोन गडी गमावले. मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगाने किवी संघावर दबाव वाढवला, त्यामुळे न्यूझीलंडने १०.३ षटकांत ५२-६ धावांपर्यंत मजल मारली. मात्र, यानंतर मिचेल सँटनर आणि जोश क्लार्कसन यांनी सातव्या विकेटसाठी 32 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. पण शेवटच्या षटकांमध्ये मथिशा पाथिरानाच्या तगड्या गोलंदाजीमुळे न्यूझीलंडला मोठी धावसंख्या होऊ दिली नाही आणि त्यांनी किवी संघाला अवघ्या 108 धावांत आटोपले.
3 WICKETS IN THE FINAL OVER! 😯
Glenn Phillips delivers a terrific over to seal a thrilling win for New Zealand 🔥#SLvNZ: https://t.co/irRxEmCsQQ pic.twitter.com/ZBETDHuE0X
— ICC (@ICC) November 10, 2024
109 धावांचे लक्ष्य ठेवणाऱ्या श्रीलंकेची सुरुवात चांगली झाली नाही आणि लवकरच कुसल मेंडिस पॅव्हेलियनमध्ये परतला. यानंतर न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये पहिली हॅटट्रिक घेत इतिहास रचला. त्याने सहाव्या षटकातील शेवटच्या चेंडूवर कुसल परेराला बाद केले आणि त्यानंतर आठव्या षटकात त्याने सलग दोन चेंडूंवर कामिंदू मेंडिस आणि चरित असालंका यांना बाद केले. त्यामुळे श्रीलंकेचा संघ ८२-७ अशा स्कोअरवर झुंजत होता.