फोटो सौजन्य - नीरज चोप्रा इंस्टाग्राम
नीरज चोप्रा : भारताच्या स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये इतिहास रचला आणि भारताला ॲथलेटिक्समध्ये सुवर्ण पदक मिळवून दिले. त्याच्या या कामगिरीने देशाला जगभरामध्ये मोठे स्थान मिळाले आहे. आता नीरज चोप्रा पुढील २४ तासांमध्ये पुन्हा पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक इव्हेंट्सच्या क्वालिफिकेशन राउंडमध्ये ॲक्शनमध्ये असेल. तो भारतीय वेळेनुसार ६ ऑगस्ट रोजी दुपारी १:५० मिनिटांनी JIO Cinema वर ॲक्शनमध्ये असणार आहे. नीरज चोप्राने ज्याप्रकारे टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये कामगिरी केली त्याप्रकारे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कामगिरी करण्याची भारतीयांना आशा आहे.
पॅरिस ऑलिम्पिकच्या उद्या म्हणजेच ६ ऑगस्ट रोजी दोन्ही गटांचा क्वालिफिकेशन राउंड आयोजित करण्यात आला आहे. या मध्ये पहिल्या गटामध्ये नीरज चोप्रा असणार आहे. त्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग १:५० मिनिटांनी सुरु होणार आहे, तर दुसऱ्या गटाचा क्वालिफिकेशन राउंड ३:२० मिनिटांनी सुरु होईल. यामधील पहिल्या बारा जणांना फायनलमध्ये जाण्याची संधी मिळेल. फायनलची भालाफेक स्पर्धा ही ८ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार रात्री ११:५५ ला सुरु होणार आहे.
भारतीय स्टार वेटलिफ्टर आणि टोकोयो ऑलिम्पिक सिल्वर पदक विजेती मीराबाई चानू सुद्धा लवकरच ॲक्शनमध्ये असणार आहे. वेटलिफ्टिंगचा इव्हेंट हा ७ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. हा इव्हेंट भारतीय वेळेनुसार रात्री ११:०० वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे भारतीयांच्या नजरा मीराबाई चानूच्या कामगिरीवर असणार आहे.
भारतीय पुरुष हॉकी संघ जर्मनी विरुद्ध ६ ऑगस्ट रोजी सामना खेळणार आहे. यामध्ये भारताच्या संघाला सुवर्ण पदक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे. हा सामना रात्री १०:३० सुरु होणार आहे.