Puneri Paltan vs Dabang Delhi Draw in Pro Kabaddi League 2024 Delhi
Pro Kabaddi League Puneri Paltan vs Dabang Delhi : कर्णधार अस्लम इनामदारच्या गैरहजेरीत चढाईच्या आघाडीवर अपयशी ठरलेल्या पुणेरी पलटणला प्रो-कबड्डीच्या ११व्या पर्वात मंगळवारी १२ गुणांची आघाडी टिकवता आली नाही. आशु मलिकच्या तुफानी चढायांनी एकवेळ भक्कम असलेला पलटणचा बचावही फिका पडला आणि सामना नाट्यमय कलाटणी घेत ३८-३८ असा बरोबरीत राहिला.
आशु मलिकचे १७, तर मोहितचे ६ गुण
पायाच्या दुखापतीमुळे अस्लम इनामदार उर्वरित लीगमध्ये खेळू शकणार नाही. याचा फटका पलटणला निश्चित बसला. आकाश शिंदेने ८ आणि मोहित गोयतने ६ गुण मिळवत चढाईत चमक दाखवली खरी, पण ते आशुचा झंझावात रोखू शकले नाही. पुणेरी पलटणने बचावाच्या आघाडीवर एकवेळ बाजी मारली होती. पण, अखेरच्या टप्प्यात दडपणाखाली आशु आणि मोहितने त्यांनाही आव्हान दिले होते. त्यामुळे अमनने हाय फाईव्हसह मिळविलेले ६ आणि गौरव खत्रीचे ४ गुण पलटणचा विजय साकार करू शकले नाहीत. सामन्याचे विशेष म्हणजे दिल्लीचा कर्णधार आशु मलिक आणि बचावपटू गौरव चिल्लर यांनी यंदाच्या हंगामातील अनुक्रमे चढाई आणि बचावातील गुणांचे शतक पूर्ण केले.
दहा मिनिटे कमालीची वेगवान
उत्तरार्धात खेळ सुरु झाल्यावर सुरुवातीची दहा मिनिटे कमालीची वेगवान झाली. प्रथम दबंग दिल्लीने पुणेरी पलटणवर लोण चढवत पिछाडी २१-१३ वरून २२-१८ अशी भरुन काढण्याचा प्रय़त्न केला. पण, याचा पलटणच्या खेळावर काही परिणाम झाला नाही. त्यांची आघाडी कायमच राहिली. उलट पूर्वार्धात फिके पडलेले आकाश शिंदे आणि मोहित गोयत या चढाईपटूंच्या जोरावर त्यांनी पाच मिनिटांत दिल्लीवर दुसरा लोण देत आपली आघाडी ३५-२४ अशी भक्कम केली.
दबंग दिल्लीच्या खेळात आशु मलिकचा वाटा मोठा
त्यानंतर अखेरच्या दहा मिनिटांच्या खेळात दंबग दिल्लीच्या आशु मलिक आणि मोहित यांच्या चढायांबरोबरच गौरव चिल्लरच्या भक्कम बचावामुळे दिल्लीने पलटणवर इतका दबाव आणला की ३५-२४ अशी पिछाडी भरुन काढत त्यांनी सामना अनपेक्षितपणे ३८-३८ असा बरोबरीत सोडवला. यामध्ये आशु मलिकचा वाटा मोठा होता. सामन्यात ३६-२८ अशा पिछाडीवर असताना आशुच्या एका अव्वल चढाईने संकेत चव्हाण, मोहित गोयत आणि अमन अशा तिघांना नुसते गारदच केले नाही, तर पलटणवर लोण देत पिछाडी ३६-३३ अशी भरुन काढली. यानंतर दिल्लीने मागे वळून बघितलेच नाही. आशु आणि मोहितच्या चढायांना गौरव चिल्लरची साथ मिळाली. सामन्यात सातत्याने पिछाडीवर राहणाऱ्या दिल्लीने अखेरच्या दहा मिनिटांत १४ गुणांची केलेली कमाईच निर्णायक ठरली. या कालावधीत पलटणला केवळ तीनच गुण नोंदवता आले.
ब्रम्हास्त्राच्या जोरावर सामन्यावर पूर्ण वर्चस्व
पूर्वार्धात, पुणेरी पलटण संघाने कर्णधार अस्लम इनामदारच्या गैरहजेरीत आपल्या बचावाच्या ब्रम्हास्त्राच्या जोरावर सामन्यावर पूर्ण वर्चस्व राखले होते. डावा कोपरारक्षक म्हणून खेळणाऱ्या अमनने पूर्वार्धातच (६) हाय फाईव्हची कामगिरी करताना दबंग दिल्लीच्या चढाईपटूंना दडपणाखाली आणले. दुसरीकडे अस्लमच्या गैरहजेरीत पुणेरी पलटणची चढाईची बाजू तोकडी पडलेली दिसून आली. आकाश शिंदे आणि मोहित गोयत यांनाच काय ती चमक दाखवता आली होती. दिल्लीकडून उजवा कोपरारक्षक योगेश आणि आशु मलिकने चमक दाखवली होती.