मुंबई : भारतीय संघाचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याचा शुक्रवारी पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पंतच्या अपघातानंतर स्थानिकांनी त्याला मदत करत रुग्णालयात नेले, परंतु या दरम्यान अपघातावेळी उपस्थितांनी काढलेले पंतचे काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या गोष्टीवर कर्णधार रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत नेटकऱ्यांवर आपला राग व्यक्त केला आहे.
रितिकाने लिहिले की, ‘एखाद्या जखमी, दुखात असणाऱ्या व्यक्तीला त्याचे अपघातातील फोटो पोस्ट करायचे आहेत की नाही हे जाणून घेतल्याशिवाय ते शेअर करणं लाजिरवाणं आहे. त्याचे कुटुंबिय, मित्र-परिवार याना याने खूप त्रास होतो. ही चूकीची पत्रकारिता आहे.’ पंतच्या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत फिरत आहेत. काही फोटोंमध्ये तो रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत दिसत आहे, तर हॉस्पिटल मधील त्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ऋषभ पंतच्या अपघातानंतर क्रीडा विश्वातील अनेक खेळाडूंनी दुःख व्यक्त करून तो लवकर बारा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे.