नवी दिल्ली – भारत-श्रीलंका टी-20 मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना राजकोटच्या सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्णधार हार्दिक पंड्याने गेल्या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही. तर दासून शनाकाने अविष्का फर्नांडोला खेळण्याची संधी दिली आहे.
या सामन्याच्या निकालावर मालिकेचा निकाल निश्चित होईल. सध्या तीन सामन्यांची मालिका 1-1अशी बरोबरीत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने तर दुसरा सामना श्रीलंकेने जिंकला होता.
टीम इंडियाला मालिकेतील दुसरा सामना गमवावा लागला असला तरी राजकोटच्या मैदानाचा विक्रम मात्र त्याच्या बाजूने दिसत आहे. गेल्या 6 वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर हरलेला नाही. त्याने येथे एकूण 4 सामने खेळले आहेत. यापैकी तीन जिंकले आहेत तर एक पराभव झाला आहे. 2017 मध्ये येथे न्यूझीलंडकडून भारताचा 40 धावांनी पराभव झाला होता.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला T20 आंतरराष्ट्रीय सामना याच मैदानावर होणार आहे. दोन्ही संघ येथे एकदिवसीय सामने खेळले आहेत.