
Vijay Hazare Trophy 2025-26: Vidarbha makes history! By defeating Saurashtra, they have won the Vijay Hazare Trophy title for the first time.
Vidarbha won the Vijay Hazare Trophy 2025-26 title : बीसीसीआयने आयोजित केलेल्या २०२५-२६ च्या विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भ आणि सौराष्ट्र आमनेसामने आले होते. या अंतिम सामन्यात विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद जिंकून विदर्भाने इतिहास घडवला आहे. विदर्भाने पहिल्यांदाच विजय हजारे ट्रॉफी आपल्या नावे केली आहे. या हंगामात विदर्भाने शानदार कामगिरीचे प्रदर्शन करत मोठी कामगिरी बजावली आहे. या हंगामात विदर्भाने रणजी ट्रॉफी, इराणी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीचे जेतेपद जिंकून आपला दबदबा निर्माण केला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात विदर्भाने सौराष्ट्राचा ३८ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच विजेतेपद आपल्या नावे केले आहे.
सौराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला तर विदर्भाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करताना विदर्भाने अथर्व तायडेच्या शतक आणि यश राठोडच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ८ गडी गमावून ३१७ धावांचा डोंगर उभा केला. विदर्भाकडून डावाची सुरुवात करण्यासाठी उतरलेल्या अथर्व तायडे आणि अमन मोखाडे यांनी शानदार फलंदाजी केली. दरम्यान, अमन ३३ धावांवर माघारी गेला. विदर्भाला ८० धावांवर पहिला झटका बसला. त्यानंतर यश राठोडने अथर्व तायडेसोबत दुसऱ्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी करत डाव सावरला आणि त्याने त्याचे शतक पूर्ण केले. अथर्व तायडे १२८ धावांवर माघारी गेला. त्यानंतर यश राठोडने आपले अर्धशतक पूर्ण करत ५४ धावांवर बाद झाला. रविकुमार स्मिथने २५, फैज मोहम्मदने १९, हर्ष दुबेने १७, नचिकेत भुतेने ८, रोहित बिनकरने ५ आणि दर्शन नालकांडेने १४ धावा केल्या. या सर्वांच्या मदतीने विदर्भाने ३१७ धावा उभ्या केल्या. सौराष्ट्राकडून अंकुर पनवारने ४ बळी घेतले, तर चेतन साकारिया आणि चिराग जानीने प्रत्येकी २ बळी घेण्यात यश मिळवले.
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, सौराष्ट्र ४८.५ षटकांत २७९ धावाच करू शकला. परिणामी त्यांना ३८ धावांनी जेतेपदाने हुलकावणी दिली. सौराष्ट्राची सुरुवात चांगली राहिली नाही. विश्वराज जडेजा ९ आणि हार्विक देसाई २० धावांवरच माघारी गेले. त्यानंतर प्रेरक मंकडने एक बाजू सावरत धावसंख्या पुढे नेत राहिले. तथापि, सौराष्ट्राच्या विकेट्स नियमित अंतराने जात राहिल्या. समर गज्जर २५ आणि पार्श्वराज राणा ७ धावांवर पव्हेलियनमध्ये गेला.
हेही वाचा : IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी
यापुढे, मांकड आणि चिराग जानी यांनी पाचव्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली खरी पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाही. प्रेरक मंकड ८८ धावांवर बाद झाल्याने सौराष्ट्राच्या विजयाच्या आशा धुळीस मिळाल्या. त्यानंतर चिराग जानी ६४ धावांवर बाद झाले. रुचित अहिर २१ आणि चेतन साकारिया ११ धावा करून बाद झाले. विदर्भाकडून यश ठाकूरने शानदार गोलंदाजी करत ९.५ षटकांत ५० धावा देत ४ बळी टिपले. नचिकेत भुतेने ३, दर्शन नालकांडेने २ आणि हर्ष दुबेने १ बळी घेतला. यावेळी सौराष्ट्रने तिसऱ्यांदा विजेतेपदाने हुलकावणी दिली. या संघाने यापूर्वी २००७-२००८ आणि २०२२-२३ मध्ये विजेतेपद आपल्या नावे केले होते.