Paris Olympic 2024
Olympic Rings : ऑलिम्पिक ही जगातील सर्वात मोठ्या खेळांमध्ये गणली जाते. 1896 मध्ये पहिले ऑलिम्पिक खेळ झाले. तेव्हापासून दर चार वर्षांनी याचे आयोजन केले जाते. प्रत्येक खेळाडूला येथे पदक जिंकायचे असते. प्रत्येक देशाच्या खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये आपली छाप सोडायची असते आणि त्यासाठी खेळाडू वर्षानुवर्षे तयारी करतात. ऑलिम्पिक चिन्हात तुम्ही वेगवेगळ्या रंगांच्या पाच रिंग पाहिल्या असतील, चला जाणून घ्या, त्यांचा काय आहे अर्थ?
1913 मध्ये पियरे डी कौबर्टिन यांनी केले डिझाइन
ऑलिम्पिक चिन्हामध्ये वेगवेगळ्या रंगांच्या पाच रिंग असतात, ज्या एकमेकांना जोडलेल्या असतात. डावीकडून उजवीकडे, या कड्या निळ्या, पिवळ्या, काळ्या, हिरव्या आणि लाल रंगाच्या आहेत आणि या सर्व कड्या समान आकाराच्या आहेत. निळ्या, काळ्या आणि लाल रंगाच्या रिंग्स वर असतील अशा प्रकारे हे डिझाइन केलेले आहेत. पिवळ्या आणि हिरव्या रिंग खाली ठेवल्या आहेत. 1913 मध्ये पियरे डी कौबर्टिन यांनी त्याची रचना केली होती. यानंतर, 1920 च्या ऑलिम्पिक खेळांमध्ये ऑलिम्पिक रिंग्जने पदार्पण केले.
रिंग पाच खंडांचे करतात प्रतिनिधित्व
ऑलिम्पिक चार्टरच्या नियम 8 नुसार, ऑलिंपिक चिन्ह ऑलिम्पिक चळवळीची क्रिया व्यक्त करते. जे ऑलिम्पिकच्या सार्वत्रिकतेचे प्रतीक आहे. पाच रिंग खेळाडूंच्या सहभागाचे प्रतीक आहेत. ऑलिम्पिक रिंग पाच खंडांचे संघटन दर्शवतात. यामध्ये आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि युरोपचा समावेश आहे. परंतु, कोणता रंग कोणत्या खंडाचे प्रतिनिधित्व करतो हे स्पष्ट नाही. पियरे डी कौबर्टिनने पांढऱ्या पार्श्वभूमीसह पाच रंगीत रिंग एकत्र करून ऑलिंपिक चिन्हाची रचना केली.
भारतातून एकूण 117 खेळाडू सहभागी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 हा 26 जुलैपासून सुरू होत आहे आणि यावेळी 10000 हून अधिक खेळाडू ऑलिम्पिकच्या महाकुंभमध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी भारताच्या क्रीडा मंत्रालयाने पॅरिस ऑलिम्पिकसाठी एकूण 117 खेळाडूंना मान्यता दिली आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपली सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि सुवर्ण पदकासह एकूण 7 पदके जिंकली होती. यावेळी भारताच्या पदकांची संख्या दुहेरी आकडीपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.