EMI न भरल्यास स्मार्टफोन होणार लॉक; RBI कडून नवी नियमावली आणण्याची तयारी
नवी दिल्ली : कर्ज काढल्यावर हफ्ते भरणे हे गरजेचे असते. कर्जाचे हफ्ते वेळेवर जमा न केल्यास अनेकदा बँकांकडून कारवाई देखील केली जाते. पण, आता हफ्ते थकले तर बँक खातेदारांचे फोन लॉक होतील, असा नियम आणण्याचा विचार भारतीय रिझर्व्ह बँक करत आहे. आरबीआय कर्ज देणाऱ्या कंपन्यांना फोन लॉक करण्याचा अधिकार देऊ शकते. हा नियम आणण्यामागील कारण म्हणजे बँका आणि वित्तीय संस्थांचे थकित कर्ज कमी करणे असल्याचे सांगण्यात येत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अनेकदा महत्त्वपूर्ण पावले उचलली जातात. त्यातच आता हफ्ते थकल्यास फोन लॉक करण्याचा विचार बँकेचा आहे. आरबीआय फेअर प्रॅक्टिस कोडमध्ये बदल करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये कर्ज देणाऱ्यांना फोन लॉक करण्यासाठी ग्राहकांची संमती घ्यावी लागेल. मात्र, त्यांचा वैयक्तिक डेटा वापरण्यावर बंदी असेल. आरबीआयने गेल्या वर्षी कर्ज न फेडणाऱ्यांचा फोन लॉक करण्याच्या नियमावर बंदी घातली होती. मात्र, आता रिझर्व्ह बँक हा नियम पुन्हा सुरू करण्याचा विचार करत आहे.
बँक खातेदारांचा डेटा सुरक्षित असावा, म्हणून बँकांना फोनच्या डेटामध्ये एंट्री दिली जाणार नाही. लॉक केलेल्या फोनचा वैयक्तिक डेटा, जसे की फोटो, मेसेज किवा संपर्क, सुरक्षित राहतील. पुढील काही महिन्यांत फेअर प्रॅक्टिस कोडमध्ये नवीन मार्गदर्शक तत्त्वे जोडली जाऊ शकतात. हा नियम लागू झाला तर कर्ज वसुली सोपी होईल आणि कमी क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना कर्ज देणे देखील सोपे होऊ शकते.
असा होईल याचा बँकेला फायदा…
एखादी बँक एखाद्या ग्राहकाला कर्ज देते तेव्हा ती त्याच्या फोनमध्ये एक अॅप इन्स्टॉल करेल. कर्जदाराचा हफ्ता थकलेला असेल तर ती त्याला सूचित करेल. तरीही ईएमआय भरला नाही, तर या अॅपद्वारे फोन रिमोटली लॉक केला जाऊ शकतो.
एकदा तुम्ही चुकलेला ईएमआय भरला की…
एकदा तुम्ही चुकलेला ईएमआय भरला की, कंपनी किंवा अॅप फोन रीस्टार्ट करण्यासाठी कोड किंवा प्रक्रिया प्रदान करते, ज्यामुळे फोन अनलॉक होतो. ईएमआय लॉकर अॅप्सद्वारे कर्ज वसुली सहजपणे करता येते. काही लोक म्हणतात की लोकांची वैयक्तिक माहिती लीक होण्याचा धोका आहे.