भारतात OTT-सोशल मीडियाचा वाढता क्रेझ, तब्बल एवढी आहे इंटरनेट युजर्सची संख्या; जाणून घ्या सविस्तर
भारतात इंटरनेट युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ग्रामीण भागापासून ते अगदी शहरी भागापर्यंत प्रत्येकजण आपल्या कामासाठी इंटरनेटचा वापर करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. IAMAI आणि KANTAR च्या ‘Internet in India’ या अहवालानुसार, 2024 मध्ये भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या 886 दशलक्षांपर्यंत होती. मात्र आता 2025 मध्ये ही संख्या 90 कोटींच्या पुढे जाऊ शकते.
झपाट्याने इंटरनेटचा विस्तार होण्याचं कारण म्हणजे डिजीटल इंडिया. टेलिकॉम कंपन्यांनी एक नवीन मिशन हाती घेत भारतातील खेड्यापाड्यांत इंटरनेट सेवा देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यामुळे आता भारतातील प्रत्येक कानाकोपऱ्यात इंटरनेट सेवा उपलब्ध होत आहे. याच कारणामुळे इंटरनेट युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंटरनेट आता दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग बनले आहे, मग ते शहरी असो वा ग्रामीण भाग सर्वत्र इंटरनेटची गरज आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील इंटरनेट वापरकर्ते वेगाने वाढत आहेत. 2024 मध्ये, भारतात 886 दशलक्ष सक्रिय इंटरनेट वापरकर्ते होते. त्यापैकी 48.8 कोटी ग्रामीण भागातील होते. देशातील एकूण इंटरनेट वापरकर्त्यांपैकी हे प्रमाण 55 टक्के आहे. त्यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागांत इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला आहे. देशातील इंटरनेट वापरकर्त्यांपैकी 47 टक्के महिला आहेत. अहवालानुसार, इंटरनेट वापरकर्ते दररोज सरासरी 90 मिनिटे इंटरनेट वापरू शकतात. पण शहरी भागातील वापरकर्ते 94 मिनिटे आणि ग्रामीण भागातील वापरकर्ते 89 मिनिटे इंटरनेटचा वापर करतात.
भारतातील बहुतेक वापरकर्ते OTT व्हिडिओ आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी इंटरनेटचा वापर करत आहेत. चॅटिंग, ईमेल आणि कॉल्ससोबतच सोशल मीडियासाठीही इंटरनेटचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. याशिवाय, डिजिटल पेमेंट्स आणि नेट कॉमर्स (ई-कॉमर्स) यामध्येही इंटरनेटची आवश्यकता असते. OTT प्लॅटफॉर्म जसे की YouTube, Netflix आणि Amazon Prime यांचा भारतात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. शहरे तसेच ग्रामीण भागातील इंटरनेट युजर्स आता OTT प्लॅटफॉर्मवर जास्त वेळ घालवत आहेत.
फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आता केवळ वैयक्तिक चॅट्सपुरता मर्यादित राहिले नाही, तर त्यांचा व्यावसायिक कामांसाठीही वापर केला जात आहे. रील बनवण्याचा ट्रेंड शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांमध्ये लोकप्रिय आहे. सुमारे 98 टक्के इंटरनेट युजर्स स्थानिक भाषांमधील कंटेट पाहणे पसंत करतात. हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती, तेलुगु आणि बंगाली या शहरांमध्ये सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या भाषा आहेत. याशिवाय, व्हॉइस कमांडचा वापरही झपाट्याने वाढत आहे. लोक आता कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ऐवजी डिजिटल वॉलेट आणि यूपीआय अधिक वापरत आहेत.