Vi 5G Update: मुंबईकरांची प्रतिक्षा अखेर संपली! या महिन्यात सुरु होणार Vi 5G सर्विस, रिचार्जही होणार स्वस्त
देशातील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या व्होडाफोन आयडिया (Vi) च्या युजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. खरं तर ही बातमी मुंबईतील Vi युजर्ससाठी आहे. कंपनी मार्च 2025 मध्ये म्हणजेच पुढील महिन्यात मुंबईत त्यांची 5G सर्विस सुरु करणार आहे. मार्च 2025 मध्ये VI ची 5G सर्विस मुंबईत सुरु केली जाणार आहे आणि त्यानंतर एप्रिलमध्ये दिल्ली, बेंगळुरू, चंदीगड आणि पटना सारख्या शहरांमध्ये त्याचा विस्तार करेल.
कंपनीच्या या निर्णयामुळे रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेल सारख्या मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा केली जाणार आहे. VI त्यांचे 5G प्लॅन जिओ आणि एअरटेलपेक्षा सुमारे 15 टक्के स्वस्त दरात देण्याची योजना आखत आहे. यामुळे दूरसंचार क्षेत्रात नवीन किंमत युद्ध सुरू होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे ग्राहकांना अधिक परवडणाऱ्या 5G सेवा मिळण्यास मदत होऊ शकते. काही महिन्यांपूर्वी टेरिफ प्लॅनच्या किंमतीत वाढ झाल्याने खाजगी टेलिकॉम कंपन्यांचे युजर्स सरकारी टेलिकॉम कंपन्यांकडे वळले. त्यामुळे खाजगी टेलिकॉम कंपन्यांच्या युजर्सच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली. मात्र आता वाढलेल्या टेरिफ प्लॅनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय VI ने घेतला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
Jefferies च्या अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये Vi ने त्यांच्या डीलर्सना कमिशन म्हणून 3,583 कोटी रुपये (विक्रीचा 8.4% वाटा) दिले, जे जिओच्या 3,000 कोटी रुपयांपेक्षा (3% विक्रीचा वाटा) जास्त आहे. त्याच वेळी, एअरटेल या बाबतीत आघाडीवर होती, ज्याने कमिशनमध्ये 6,000कोटी रुपये (विक्रीचा 4% वाटा) खर्च केले.
Vi ने अलीकडेच नोकिया, एरिक्सन आणि सॅमसंगसोबत 30,000 कोटी रुपयांचा (3.6 अब्ज डॉलर्स) करार केला आहे. कंपनी 4G कव्हरेजचा वेगाने विस्तार आणि 5G नेटवर्क स्थापित करण्यावर काम करत आहे. पुढील तीन वर्षांत सुमारे 75,000 5G बेस स्टेशन स्थापित करण्याची Vi ची योजना आहे. त्यामुळे आता इतर कंपन्यांच्या टेलिकॉम युजर्सप्रमाणे Vi युजर्सना देखील 5G नेटवर्क वापरण्याची संधी मिळणार आहे.
गेल्या टॅरिफ वाढीदरम्यान, जिओ आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना 5G सेवांचा लाभ घेण्यासाठी महागडे प्लॅन स्वीकारण्यास भाग पाडले होते. परंतु Vi चे सीईओ अक्षय मुंध्रा यांनी संकेत दिले की त्यांची कंपनी त्यांच्या स्पर्धकांपेक्षा कमी किमतीत 5G सेवा प्रदान करेल. Vi ची 5G सेवा 3.5 GHz (C-बँड) आणि 1,800 MHz स्पेक्ट्रमच्या संयोजनाचा वापर करून सुरू केली जाईल. कंपनीची ही रणनीती 5G सेवा जलद आणि व्यापक प्रवेश सुनिश्चित करण्यास मदत करेल. Vi च्या या लाँचमुळे भारतीय दूरसंचार क्षेत्रात नवीन स्पर्धा निर्माण होऊ शकते आणि ग्राहकांना स्वस्त दरात चांगल्या सेवा मिळू शकतात.