सावधान! डिजीटल अरेस्टमुळे होऊ शकतं कोट्यावधींचं नुकसान, सुरक्षेसाठी या टीप्स फॉलो करा
आपल्या देशात दररोज डिजीटल अरेस्टची नवी प्रकरण समोर येत आहेत. अजूनही अशी अनेक लोक आहेत, ज्यांना डिजीटल अरेस्टबद्दल माहित नाही. डिजीटल अरेस्ट म्हणजे नक्की काय, फ्रॉडर्स कशा प्रकारे आपली फसवूणक करतात आणि या सगळ्यापासून आपला बचाव कसा करावा, याबद्दल जाणून घेऊया. डिजीटल अरेस्ट टाळणे हे खूप अवघड काम आहे पण जर तुम्ही थोडे सतर्क आणि जागरूक असाल तर सायबर फ्रॉडर्स तुमचे काहीही नुकसान करू शकत नाहीत. (फोटो सौजन्य – pinterest)
डिजिटल अरेस्ट ही ब्लॅकमेलिंगची प्रगत पद्धत आहे. डिजिटल अरेस्ट घोटाळ्याचे बळी ते लोक आहेत जे कमी शिक्षित आहेत. डिजिटल अरेस्ट म्हणजे कोणीतरी तुम्हाला ऑनलाइन धमकावत आहे आणि व्हिडिओ कॉलिंगद्वारे तुमच्यावर नजर ठेवत आहे. डिजिटल अरेस्टदरम्यान, सायबर फ्रॉडर्स लोकांना धमकावण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी बनावट पोलीस अधिकारी म्हणून संवाद साधतात. यावेळी फ्रॉडर्स लोकांना खोट्या केसमध्ये अडकण्याचा प्रयत्न करतात आणि ह्या केस बंद करण्यासाठी लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळतात.
हेदेखील वाचा- आयफोन 15 घेण्याचा विचार करताय? मग फ्लिपकार्ट दिवाळी सेल आहे ना! भरघोस डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी
मॅसेज किंवा फोन कॉलने डिजिटल अरेस्टची प्रोसेस सुरू होते. डिजिटल अरेस्ट करणारे म्हणजेच सायबर फ्रॉडर्स लोकांना फोन करतात आणि म्हणतात की ते पोलीस विभाग किंवा आयकर विभागातून बोलत आहेत. तुमचा पॅन आणि आधार वापरून अनेक वस्तू खरेदी केल्या गेल्या किंवा मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचे सायबर फ्रॉडर्स लोकांना सांगतात.
अनेक वेळा कस्टम विभागाकडून फोन येत असल्याचा दावाही केला जातो आणि तुमच्या नावावर पार्सल आले असून त्यात ड्रग्ज किंवा प्रतिबंधित वस्तू आहेत, असं सांगितलं जातं. या संपूर्ण प्रकरणादरम्यान फ्रॉडर्स लोकांना व्हिडीओ कॉल सुरु ठेवण्यास सांगतात. या कालावधीत कोणाशीही बोलणे, मॅसेज करणे किंवा भेटणे यांना मनाई असते. यावेळी जामिनाच्या नावाखाली लोकांकडून पैसेही मागितले जातात. अशा प्रकारे, लोक त्यांच्या स्वतःच्या घरात ऑनलाइन कैद राहतात आणि याला डिजिटल अरेस्ट म्हणतात.
तुम्ही जागरूक आणि सावध राहून डिजीटल अरेस्टपासून स्वत:चा बचाव करू शकता. डिजिटल अरेस्टची सुरुवात तुमच्या भीतीने होते. अशा परिस्थितीत तुम्हालाही असे धमकीचे फोन येत असतील तर घाबरण्याची गरज नाही. जर कोणी तुम्हाला फोन करून धमकी देत असेल तर घाबरू नका, पण धैर्याने त्याचा सामना करा, कारण जर तुम्ही कोणतेही पार्सल ऑर्डर केले नसेल तर घाबरण्याची गरज नाही.
हेदेखील वाचा- सॅमसंग घेऊन येतोय AI फीचर्ससह नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन, कधी होणार लाँच? वाचा सविस्तर
असे फोन आल्यास तत्काळ पोलिसांकडे तक्रार करा. कोणताही संदेश किंवा ई-मेल आल्यास पुरावा म्हणून पोलिसांना द्या. जर काही कारणास्तव तुम्हाला कॉल आला आणि कोणीतरी तुम्हाला व्हिडिओ कॉलवर धमकावू लागला, तर स्क्रीन रेकॉर्डिंगद्वारे व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करा आणि तक्रार करा. कोणत्याही धमकीला घाबरू नका आणि पैसे अजिबात पाठवू नका.