भाऊबीजेच्या दिवशी का बंद होतात केदारनाथची दारं
भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकीच एक आहे केदारनाथ. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक केदारनाथदेखील आहे. हे धार्मिक स्थळ फक्त भारतातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. दरवर्षी हजारो पर्यटक केदारनाथला भेट देण्यसाठी येत असतात. या ठिकाणाला स्वर्गाचे रूप असल्याचे मानले जाते. येथील सुंदरता अनेक पर्यटकांना याकडे आकर्षित करत असते.
मात्र तुम्हाला माहित आहे का? भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथ धामचे दार बंद करण्यात येते. यांनतर कोणालाही याच्या आत प्रवेश मिळत नाही. असे प्रत्येक भाऊबीजेला केले जाते. विधीवत समाधी पूजा केली की, मग प्रवेशद्वार बंद करण्यात येते. दरवर्षी बाबा केदार यांच्या दर्शनासाठी येथे भाविकांची मोठी गर्दी होते. भोलेनाथ भक्तांची या मंदिरावर अपार श्रद्धा आहे.
भाऊबीजेच्या दिवशी केदारनाथ धामचे दरवाजे हिवाळ्यासाठी बंद केले जाते आणि अवघ्या 6 महिन्यांपर्यंत हे दार बंदच ठेवले जाते. यावेळी भाविकांना उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात बाबा केदारनाथाचे दर्शन घेता येईल. वास्तविक, केदारनाथ मंदिराचे दरवाजे बंद केल्यांनतर, बाबा केदारनाथची पंचमुखी डोली मोठ्या थाटामाटात उखीमठच्या ओंकारेश्वर मंदिरात नेली जाते. त्यानंतर पुढील सहा महिने भाविक ओंकारेश्वर मंदिरात शंकराचे दर्शन घेऊ शकतात.
केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याची आणि बंद करण्याची तिथी निश्चित असते. या तिथीलाच मंदिराचे दरवाजे उघडले आणि बंद केले जातात. बाबा केदारनाथ धामचे दरवाजेही प्रत्येक भाऊबीज म्हणजेच दिवाळीनंतर दोन दिवसांनी बंद होतात. मात्र असे नक्की का केले जाते? याविषयी आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगणार आहोत.
पौराणिक कथेनुसार, पांडव त्यांच्या पत्नीसह हिमालयात पोहचले, जेथे त्यांनी भगवान शिवाचे मंदिर बांधले. यांनतर त्यांनी येथे आपल्या पूर्वजांना प्रार्थना केली आणि मग नंतर त्यांना स्वर्ग प्राप्त झाला. असे म्हणतात की ज्या दिवशी पांडवांनी आपल्या पूर्वजांना प्रार्थना केली, तो दिवस भाऊबीजेचा होता. त्यामुळेच या दिवशी केदारनाथचे दरवाजे बंद केले जातात.
याचे दुसरे कारण म्हणजे भाऊबीजेच्या दिवसापासून हिवाळा ऋतू सुरु होतो. या ऋतूत हिमालयीन प्रदेशात राहणे फार कठीण असते. वास्तविक हिवाळ्यात हिमालयात प्रचंड बर्फवृष्टी होते. याच कारणांमुळे भाऊबीजेनंतर बाबा केदारनाथचे दर्शन बंद करून पुढील 6 महिने मंदिराचे दरवाजे बंद केले जातात.