अकोला : राजकीय पक्षांसाठी नेते महत्त्वाचे असतात पण त्याचबरोबर कार्यकर्ते देखील तितकेच महत्त्वाचे असतात. कार्यकर्त्यांचे आपल्या पक्षांच्या नेत्यांवर प्रेम आणि विश्वास असतो. मात्र अकोल्यामधील एका कार्यकर्त्याने चक्क नाना पटोले यांचे पाय धुवून दिले आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे एका कार्यकर्त्याने चिखलाने माखलेले पाय धुवून दिले आहेत. सोशल मीडियावर याचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सध्या अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतले. पालखी नानासाहेब चिंचोळकर विद्यालयामध्ये वास्तावास थांबली होती. पावसामुळे विद्यालयाच्या मैदानावर चिखल साचला होता. पालखीच्या दर्शनाला आलेल्या नाना पटोले यांचे पाय चिखलाने माखले. मात्र दर्शनानंतर चिखलाने माखलेले पाय घेऊन नाना पटोले गाडीजवळ आले. त्यांचे हे चिखलाचे पाय काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याने धुतले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याने धुतल्यामुळे राजकीय वर्तुळात टीका केली जात आहे.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीकेची झोड उठली आहे. काँग्रेस प्रदेशाध्याक्षांच्या या कृतीमुळे नेटकरी संतापले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की ही व्हिडिओ बघून लक्षात येत आहे की कार्यकर्ता शेवटी कार्यकर्ताच राहतो. तर दुसऱ्याने लिहिले आहे की यावरुन त्यांच्या पक्षामध्ये किती समानता आहे हे लक्षात येते. अशी टीका केली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी देखील ही व्हिडिओ ऑफिशियल अंकाऊंटवरुन शेअर करुन काँग्रेस पक्ष व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाणा साधला आहे.