भविष्य अन् ताटातलं अन्न, एका क्षणात हिरावलं; बांगलादेशातील विमान अपघातात १९ विद्यार्थ्यांचा मृत्यू, १६० जण देतायेत मृत्यूशी झुंज
बांगलादेशच्या राजधानीत सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १६० जण गंभीर जखमी असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. यामध्ये बहुसंख्य विद्यार्थी आणि शिक्षक आहेत. ढाका शहाराच्या उत्तर भागात असलेल्या माइलस्टोन स्कूल अॅण्ड कॉलेजच्या आवारात बांग्लादेश हवाई दलाचे एक F-7 BGI ट्रेनिंग जेट कोसळलं होतं.
ही घटना दुपारी १ वाजून ६ मिनिटांनी घडली. चीनच्या मिग-21 प्रकारातील सुधारित विमान F-7 BGI जेट या विमानाने कुरमिटोला हवाई तळावरून नियमित प्रशिक्षणासाठी उड्डाण भरलं होतं. उड्डाणानंतर काही मिनिटांतच तांत्रिक बिघाड झाल्याने पायलटने विमान घनदाट वस्तीपासून दूर नेण्याचा आटोकाट प्रयत्न केला, मात्र माइलस्टोन शाळेच्या दोन मजली इमारतींसमोर कोसळले.
विमान कोसळताच जणू ज्वालामुखीचा उद्रेक व्हावा, असा आवाच आल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. परिसरात आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पसरले होते. काही विद्यार्थी परीक्षा देत होते, काही कँटीनमध्ये जेवण करत होते, तर काही खेळाच्या मैदानात होते. अचानक झालेल्या स्फोटामुळे शाळेच बराचसा भाग आगीत सापडला आणि अवघा परिसर किंकाळ्यांनी भरून गेला.
“मलब्याखालून एकामागून एक मृतदेह बाहेर येत होते. त्यांना बॉडी बॅगमध्ये टाकलं जात होतं. सगळीकडे मृतदेहांचा खच आणि ओरडणाऱ्या लोकांचा आवाज होता.” आणखी एका शिक्षकाने वर्णन करताना सांगितले, “मी गेटवर विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेलो होतो, आणि अचानक एक स्फोट झाला. मागे पाहिलं, तर फक्त धूर आणि जळालेली इमारत दिसत होती.”
अग्निशमन दल, सैन्य व पोलिसांनी तत्काळ बचावकार्य सुरू केलं. मात्र अॅम्ब्युलन्सच्या अपुऱ्या संख्येमुळे अनेक जखमींना रिक्षा, व्हॅन, आणि खासगी वाहनांतून रुग्णालयात नेण्यात आलं. अग्निशमन व नागरी संरक्षण विभागाचे महासंचालक ब्रिगेडियर जनरल मुहम्मद जाहेद कमाल यांनी अधिकृतपणे मृतांचा आकडा १९ असल्याची माहिती दिली.
विमान उडवत असलेले फ्लाईट लेफ्टनंट मोहम्मद तौकीर इस्लाम सागर हे ३५व्या स्क्वॉड्रनमधील असून त्यांचं हे पहिलं उड्डाण होतं. अपघात होण्यापूर्वी त्यांनी विमान जाणीवपूर्वक रहिवासी भागांपासून दूर नेण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटच्या क्षणी ते अपयशी ठरले.
या भयाण प्रसंगाचा साक्षीदार ठरलेले विद्यार्थीही अजून धक्क्यात आहेत. १८ वर्षीय शफिउर रहमान शफी म्हणाला, “आम्ही सीनिअर ग्राउंडवर होतो, आणि पाहिलं की एक विमान ज्यूनीअर ग्राउंडच्या दिशेने झेपावतं आहे. इतका जोरात धक्का बसला की, वाटलं जणू भूकंप आल्याचा भास झाला.
या आघाताचा परिणाम फक्त उपस्थित विद्यार्थ्यांवरच नव्हे, तर शाळेबाहेर असलेल्या विद्यार्थ्यांवरही झाला. १६ वर्षीय रफीका ताहा, जी त्या वेळी शाळेत नव्हती, “टीव्हीवर व्हिडिओ पाहून मी खूप घाबरले. ही माझीच शाळा आहे, जिथं २,००० विद्यार्थी शिकतात.”सध्या ढाक्यातील रुग्णालयांत जखमींवर उपचार सुरू असून, अनेक गंभीर जखमी मृत्यूशी झुंज देत आहेत. देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे.