
फोटो सौजन्य सोशल मीडिया
डांगोटे रिफायनरीच्या IPO ला १४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, गुंतवणूकदारांना १३ ऑक्टोबरपर्यंत शेअर्ससाठी अर्ज करता येणार आहे. कंपनीचे शेअर्स नायजेरियाच्या स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध होणार आहेत. या विक्रीमध्ये छोट्या गुंतवणूकदारांनाही सहभागी होता यावे, यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म आणि फिनटेक माध्यमातून गुंतवणुकीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या IPO मध्ये कंपनीच्या सुमारे ३.३ टक्के हिस्स्याची विक्री केली जात आहे. डांगोटे समूहाचा कंपनीवरील मोठा हिस्सा मात्र कायम राहणार आहे. त्यामुळे कंपनीवरील नियंत्रण डांगोटे समूहाकडेच राहणार आहे.
लागोसजवळ उभारण्यात आलेली डांगोटे रिफायनरी आफ्रिकेतील सर्वात मोठ्या तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास २० अब्ज डॉलर खर्च झाला आहे. २०२४ मध्ये या रिफायनरीमधून उत्पादनाला सुरुवात झाली. सध्या प्रकल्पाची उत्पादन क्षमता दररोज सुमारे ७ लाख बॅरल आहे.
या रिफायनरीमुळे नायजेरियाला परिष्कृत पेट्रोलियम उत्पादनांच्या बाबतीत मोठा फायदा झाला आहे. देशांतर्गत इंधनाची गरज भागवण्याबरोबरच भविष्यात आफ्रिकेतील इतर देशांना इंधन निर्यात करण्याची क्षमता वाढवण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
IPO मधून मिळणाऱ्या निधीचा मोठा भाग रिफायनरीच्या विस्तारासाठी वापरण्याची योजना आहे. कंपनीची उत्पादन क्षमता पुढील काही वर्षांत ७ लाख बॅरलवरून तब्बल १४ लाख बॅरल प्रतिदिन करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यामुळे डांगोटे रिफायनरी जागतिक पातळीवरील सर्वात मोठ्या रिफायनरींपैकी एक बनण्याची शक्यता आहे.
या विक्रीमुळे सामान्य गुंतवणूकदारांना आफ्रिकेतील सर्वात मोठ्या औद्योगिक प्रकल्पांपैकी एका कंपनीत भागीदारी करण्याची संधी मिळणार आहे. मात्र, कंपनीचे मोठे मूल्यांकन, भविष्यातील विस्ताराचा खर्च आणि तेल बाजारातील चढ-उतार यामुळे गुंतवणुकीतील जोखीमही कायम राहणार आहे. आफ्रिकेच्या शेअर बाजारासाठी हा IPO ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.