
फोटो सौजन्य AI
आपण शाळेत, पुस्तकांमध्ये आणि विविध माध्यमांमध्ये पाहिलेला जगाचा नकाशा मोठ्या प्रमाणावर Mercator Projection वर आधारित आहे. हा नकाशा १५६९ मध्ये तयार करण्यात आला होता आणि त्याचा मुख्य उद्देश समुद्री मार्ग निश्चित करण्यासाठी होता. पृथ्वी गोलाकार असल्याने तिचे सपाट नकाशावर चित्रण करताना काही भागांचा आकार बदलतो.
या प्रक्षेपणात विषुववृत्ताजवळील प्रदेश तुलनेने लहान, तर उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेश मोठे दिसतात. त्यामुळे आफ्रिकेचा आकार प्रत्यक्षापेक्षा कमी भासतो. विशेष म्हणजे नकाशावर ग्रीनलँड आणि आफ्रिका जवळपास समान आकाराचे दिसतात प्रत्यक्षात मात्र आफ्रिका ग्रीनलँडपेक्षा तब्बल १४ पट मोठा आहे.
आफ्रिकन देशांनी या नकाशातील विसंगती दूर करण्यासाठी मोहीम सुरु केली . टोगोच्या नेतृत्वाखाली संयुक्त राष्ट्रांमध्ये मांडलेल्या प्रस्तावाला ४ सप्टेंबर २०२६ रोजी मोठे समर्थन मिळाले . १६४ देशांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले . तर अमेरिका हा विरोध करणारा एकमेव देश ठरला .
सहा देशांनी मतदानात तटस्थ भूमिका घेतली आहे . या प्रस्तावातून Equal Earth Projection सारख्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने अधिक अचूक नकाशांचा वापर करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. या नकाशात आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि इतर विषुववृत्तीय प्रदेशांचा तुलनात्मक आकार अधिक वास्तववादी दिसतो.
UNचा हा निर्णय म्हणजे आफ्रिकेच्या देशांच्या सीमा बदलणे किंवा नवीन भौगोलिक सीमा निश्चित करणे असा अजिबात नाही. हा निर्णय केवळ जगाचा नकाशा अधिक अचूक पद्धतीने दाखवण्याबाबत आहे.
प्रस्ताव कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नाही. त्यामुळे Mercator Projectionचा वापर तात्काळ बंद होणार नाही. विशेषतः समुद्री आणि हवाई नेव्हिगेशनसाठी त्याचा वापर अद्याप उपयुक्त मानला जातो. मात्र, शाळा, पाठ्यपुस्तके, सरकारी संस्था, माध्यमे आणि डिजिटल मॅपिंग प्लॅटफॉर्मवर आफ्रिकेचा खरा आकार दाखवणाऱ्या नकाशांचा वापर वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या निर्णयामुळे केवळ नकाशातील भौगोलिक अचूकतेचा प्रश्न समोर आलेला नाही, तर आफ्रिकेकडे जग कशा पद्धतीने पाहते, यावरही चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे “आफ्रिकेचा नकाशा बदलला” ही बातमी प्रत्यक्षात खंडाच्या सीमा बदलण्याची नसून, जगाच्या नकाशावर आफ्रिकेचा खरा आकार आणि महत्त्व अधिक अचूकपणे दाखवण्याची आहे.