
फोटो सौजन्य सोशल मीडिया
पश्चिम आफ्रिकेतील नायजरची राजधानी नियामी येथे लष्करी बंडाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उडाली आहे. राजधानीतील अनेक भागांमध्ये गोळीबार आणि स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. बंडखोर सैनिकांनी विमानतळ आणि राष्ट्रपती भवन परिसराला लक्ष्य केल्याचे सांगण्यात येत आहे.
या घटनेमुळे राजधानीतील सुरक्षा व्यवस्था सतर्क करण्यात आली. महत्त्वाच्या सरकारी आणि लष्करी ठिकाणांभोवती सुरक्षा वाढवण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली.
US-China AI : अमेरिकन चिप्सवर चीनचा ‘फिजिकल एआय’ व्यवसाय; नियमांच्या चौकटीत व्यापार सुरू
बंडखोर सैनिकांनी दिओरी हमानी आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच राष्ट्रपती भवनाच्या परिसरात हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. काही भागात सुरक्षा दल आणि बंडखोर सैनिकांमध्ये चकमक झाल्याची माहिती आहे.
हल्ल्यामुळे राजधानीतील काही भागांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सरकारी यंत्रणांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा दल तैनात केले. बंडामागे किती सैनिक सहभागी होते आणि त्यांचा नेमका उद्देश काय होता, याबाबत अधिकृत पातळीवर सविस्तर माहिती समोर आलेली नाही.
West Bank News : कुसरामध्ये इस्रायली वसाहतवाद्यांचा धुडगूस; पॅलेस्टिनी कामगारांवर दगडफेक
नायजरमध्ये जुलै 2023 मध्ये लष्करी सत्तांतर झाले होते. त्यानंतर देशाची सत्ता लष्करी नेतृत्वाकडे आहे. त्यामुळे राजधानीत झालेल्या ताज्या लष्करी उठावाच्या प्रयत्नामुळे देशातील राजकीय अस्थिरतेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
नायजरसह पश्चिम आफ्रिकेतील साहेल भागात दहशतवादी हिंसाचार आणि सुरक्षेची समस्या गंभीर आहे. देशाच्या विविध भागांमध्ये सुरक्षा दलांना दहशतवादी गटांचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर सैन्यातील अंतर्गत मतभेद किंवा बंडाचा कोणताही प्रयत्न सरकारसाठी मोठे आव्हान ठरू शकतो.
दरम्यान, सुरक्षा दलांनी राजधानीतील परिस्थिती नियंत्रणात आणल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र बंडाच्या प्रयत्नामागील कारणे आणि त्याचे संभाव्य राजकीय परिणाम याबाबत पुढील काळात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.