BLA has launched major attacks in Quetta and Mastung directly challenging Pakistan
इस्लामाबाद/क्वेट्टा – बलुचिस्तानमधील स्वातंत्र्याच्या लढ्याला नवसंजीवनी देणारी एक मोठी घटना समोर आली आहे. बलुच लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानविरोधात एकाच वेळी क्वेट्टा आणि मास्तुंग येथे मोठे हल्ले करून पाकिस्तान सरकारला थेट आव्हान दिले आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचे जवान आणि त्यांचे सहकारी लक्ष्य करण्यात आले असून, या कारवायांना ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले आहे.
क्वेट्टामध्ये पाकिस्तान सरकारकडून आयोजित करण्यात आलेल्या तथाकथित विजय दिनाच्या कार्यक्रमादरम्यान मुनीर मेंगल रोडवर ग्रेनेड हल्ला झाला. हा कार्यक्रम खासदार अली मदाद जट्टक यांच्या नेतृत्वाखाली लष्कराच्या संरक्षणाखाली होत होता. हल्ल्यामुळे एक एजंट ठार झाला असून, १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा हल्ला फक्त एक सुरक्षा अपयश नव्हता, तर बलुच लढ्याचे प्रतीकात्मक बंड होते. बीएलएने स्पष्ट केले आहे की, “बलुचिस्तानवर पाकिस्तानचा कब्जा असलेल्या स्थितीत, असे राष्ट्रीय उत्सव हे आमच्यासाठी अपमानास्पद आहेत आणि ते सहन केले जाणार नाहीत.”
क्वेट्टातील हल्ल्याच्या काही तासांनंतर, मास्तुंगमधील एमसीसी क्रॉस येथे असलेल्या लष्करी चौकीवरही बीएलएच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात ४ पाकिस्तानी जवान जखमी झाले. ही चौकी स्थानिक बलुच नागरिकांवर अन्याय व अत्याचारांचे केंद्रस्थान बनली होती, असे बीएलएने स्पष्ट केले आहे. या चौकीवर महिला, वृद्ध नागरिक, आणि तरुणांवर पद्धतशीर अन्याय केल्याचा आरोप बीएलएने पाकिस्तान लष्करावर ठेवला आहे. हल्ल्यानंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर लष्करी हलचाली सुरू झाल्या आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Kirana Hills’ आहे सीझफायर मागील ‘काळं’ सत्य? पाकिस्तानच्या अण्विक धोक्यांचं गूढ आलं जगासमोर
बीएलएचे प्रवक्ते झीनद बलोच यांनी या हल्ल्यांनंतर एका तीव्र निवेदनात म्हटले आहे की,
“बलुच लोकांची ओळख, अधिकार आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या कुठल्याही प्रकारच्या हस्तक्षेपाचा आता स्फोटक प्रतिसाद दिला जाईल. जग आता पाहत आहे की बलुचिस्तानात पाकिस्तानी सैन्यासाठी एकही ठिकाण सुरक्षित राहिलेले नाही.”
हे विधान केवळ पाक सरकारसाठीच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय समुदायासाठीही एक इशारा आहे. बलुच चळवळीला आता स्थानिक जनतेचा सक्रिय पाठिंबा मिळतो आहे, आणि ती एका फुटीर संघटनेच्या मर्यादेपलीकडे गेली आहे.
या हल्ल्यांनंतर पाकिस्तान सरकारने तात्काळ प्रतिक्रिया दिली असून, क्वेट्टामध्ये कठोर सुरक्षा उपाय लागू करण्यात आले आहेत. शहरात कंटेनर लावून नाकाबंदी करण्यात आली असून, अनेक भागांत संचारबंदीचा अंमल आहे. सरकारने या कारवाया दहशतवादी हल्ले म्हणून घोषित केले आहेत. मात्र स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की सरकारची ही हालचाल परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनवत आहे.
पाकिस्तान सरकारकडून वारंवार बलुच चळवळीला बाह्य शक्तींचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातो, पण प्रत्यक्षात ही चळवळ वर्षानुवर्षे चाललेल्या दडपशाही, अन्याय, आणि शोषणातून उद्भवलेली आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या मते, ही चळवळ आता केवळ काही लढवय्यांची नाही, तर जनतेच्या मनातील क्रांतीचा आवाज आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानमध्ये 4 दिवसांत महाविध्वंस, न्यूयॉर्क टाइम्सनेही मान्य केली भारताची ताकद; पाहा Satellite Images
क्वेट्टा आणि मास्तुंगमधील या हल्ल्यांनी पाकिस्तान सरकारला गंभीर इशारा दिला आहे – बलुचिस्तानमधील असंतोष केवळ तात्पुरता नाही, तर तो खोलवर रुतलेला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून बीएलएने केवळ हल्ला केला नाही, तर बलुच स्वातंत्र्यलढ्याचे एक नवे पर्व सुरू केले आहे. जगाच्या नजरा आता बलुचिस्तानकडे वळल्या आहेत – आणि हा संघर्ष आता पुन्हा दडपून टाकता येईल असा प्रश्नही धूसर होत चालला आहे.