
Bomb Blast at mosque in Jakarta: इंडोनेशियातील जकार्तामधून मोठी बातमी समोर आली आहे. जकार्ता येथील स्टेट सीनियर हायस्कूल ७२ (एसएमए नेगेरी ७२) येथील मशिदीत शुक्रवारच्या प्रार्थनेदरम्यान अनेक बॉम्बस्फोट झाल्याची माहिती आहे. या बॉम्बस्फोटात किमान ५४ जण जखमी झाले. त्यापैकी बहुतेक विद्यार्थी आणि शिक्षक होते. ही घटना दुपारी १२:३० च्या सुमारास केलापा गडिंग परिसरातील नौदल संकुलात घडली. सध्या तरी या स्फोटाच कारण समोर आलेले नाही. जकार्ता पोलिस या घटनेचा तपास करत असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (International News)
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मशिदीत सकाळची प्रार्थना सुरू असताना मशिदीच्या मुख्य हॉलच्या मागील बाजूस मोठमोठे स्फोट झाले, ज्यामुळे मशिदीतील भाविकांमध्ये घबराट पसरली होती. प्रार्थना करणाऱ्यांनी आश्रय घेण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. मशिदीतील गणिताचे शिक्षक बुडी लक्सोनो म्हणाले, “नमाजाला सुरवात होताच अचानक एक शक्तिशाली स्फोट झाला. काही क्षणातच मशिदीत धुराचे लोट पसरू लागले मुलांनी जीव वाचवण्यासाठी मशिदीतून बाहेर धाव घेतली. अनेक जण चांगलेच घाबरले बोते. अनेकजण घाबरून जागीच कोसळले.
स्फोटामुळे काचेचे तुकडे जागोजागी पसरले होते. काचेच्या तुकड्यांमुळे आणि स्फोटाच्या जोरामुळे बहुतेक जखमींना किरकोळ दुखापत झाली. सर्वांना प्राथमिक उपचारासाठी केलापा गडिंग जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या घटनेनंतर नौदल कर्मचारी आणि जकार्ता पोलिसांनी परिसराला वेढा घातला. तर बॉम्बशोधक पथकांनी मशीद आणि आजूबाजूच्या परिसराची तपासणी सुरू केली.
प्राथमिक तपासात स्फोटाचे निश्चित कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अधिकारी इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट, इलेक्ट्रॉनिक उपकरणातील बिघाड आणि इतर काही शक्यतांचा विचार करत आहेत. तथापि, घटनास्थळाजवळ घरगुती स्फोटक उपकरण, रिमोट कंट्रोल तसेच एअरसॉफ्ट आणि रिव्हॉल्व्हरसारख्या शस्त्रांचे काही भाग आढळल्याने संशय अधिक गडद झाला आहे.
शहर पोलिस आयुक्त ए. डी. सुहेरी यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, स्फोटानंतर तब्बल ५४ जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यापैकी काहींची प्रकृती गंभीर असून, अनेकांना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. वैद्यकीय पथक त्यांच्यावर उपचार करत असून, त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ आणि मशिद परिसर सील केला असून, स्फोटाच्या कारणाचा सखोल तपास सुरू आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या अफवांना बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.
सध्या, इंडोनेशियामध्ये फक्त एकच दहशतवादी संघटना, जमाह अन्शारुत दौलाह सक्रिय आहे. ती २०१५ मध्ये स्थापन झाली आणि इस्लामिक स्टेटचा प्रभाव आहे. सध्या, GAD संघटनेचे अंदाजे २००० लढवय्ये इंडोनेशियामध्ये सक्रियपणे कहर करत आहेत. इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, इंडोनेशियाची एकूण लोकसंख्या अंदाजे २७८ दशलक्ष आहे, ज्यापैकी २३० दशलक्ष मुस्लिम आहेत.