भारतासोबतचा वाद कॅनडाच्या पंतप्रधानांना पडला महागात; त्यांच्याच पक्षातील खासदारांची राजीनाम्याची मागणी
नवी दिलली: कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो सध्या गंभीर अडचणीत सापडले आहेत. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येसाठी त्यांनी भारतावर केलेले आरोप आणि त्यानंतर निर्माण झालेला राजनैतिक संघर्ष त्यांना चांगलाच महागात पडला आहे. या वादामुळे कॅनडाच्या लिबरल पक्षातील काही खासदारांनी त्यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी केली आहे.
त्यांच्या पक्षातील खासदारांनी केली राजीनाम्याची मागणी
मीडिया रिपोर्टनुसार, शार्लोटटाऊन येथील खासदार शॉन केसी यांनी एका मुलाखतीत ट्रूडो यांच्या नेतृत्वावर तीव्र टीका केली. खासदार शॉन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, ‘त्यांचे मतदार ट्रूडो यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत आणि त्यांची पंतप्रधान पदावरून पायउतार होण्याची वेळ आली आहे.’ तसेच केसी यांनी ट्रूडो यांच्या 9 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कामाचे कौतुक केले असले मात्र, मतदारांचा पाठिंबा कमी होत असल्यामुळे त्यांनी आता बाजूला व्हावे, असे ठामपणे सांगितले आहे.
इतकेच नाही तर लिबरल पक्षाच्या कासदारांनी ट्रुडो यांना याबाबत निर्णय घेण्यासाठी २८ ऑक्टोबरची मुदत दिली आहे. 28 ऑक्टोबरपर्यंत ट्रुडो यांनी पायउतार होण्याचा निर्णय घेतला नाही तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही काही खासदारांनी म्हटले आहे. याशिवाय, मॉन्ट्रियलचे खासदार अँथनी हाऊसफादर यांनीही पक्षात ट्रूडो यांच्या नेतृत्वावर विचारमंथनाची गरज असल्याचे मत मांडले. त्यांनी पुढील निवडणुका कोणाच्या नेतृत्वाखाली लढायच्या, यावर पक्षात चर्चा व्हायला हवी असे सूचित केले आहे.
भारताशी पंगा घेणे ट्रुडो यांना महागात पडले
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो हे खलिस्तानी दहशतवादी निज्जरच्या हत्येसाठी गेल्या एक वर्षापासून भारतावर आरोप करत आहेत, मात्र आजपर्यंत त्यांचे सरकार आणि पोलिसांना एकही पुरावा भारतासमोर मांडलेला नाही. काही दिवसांपूर्वी ट्रुडो सरकारने कॅनडात उपस्थित असलेल्या भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते, त्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा एकदा शिगेला पोहोचला आहे.
भारताचे कॅनडाशी राजनैतिक संबंध बिघडले
भारतावरील आरोपांमुळे कॅनडा-भारत संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध कमी झाले आहेत. तसेच कॅनडातील अनेक राजकीय आणि सामाजिक घटक ट्रूडो यांच्या धोरणांवर टीका करत आहेत. भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर, कॅनडाच्या मीडियाने देखील ट्रूडो सरकारवर टीका केली आहे. या वादामुळे ट्रूडो यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्यांच्या लिबरल पक्षातील असंतोष देखील उघडपणे पुढे येत आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असून, याचा प्रभाव आगामी राजकीय परिस्थितीवर होण्याची शक्यता आहे.