China deploys weapons on 360 space satellites India also prepared
China Space Warfare : जागतिक पातळीवरील लष्करी समीकरणे आता जमिनीवर नाहीत, तर अवकाशात बदलू लागली आहेत. चीनने आपली अवकाशात लष्करी उपस्थिती दाखवून आणि ३६० हून अधिक उपग्रहांमध्ये शस्त्रसज्जता दाखवून जगाला धक्का दिला आहे. यामुळे भारतासाठीही नव्या धोक्यांचा इशारा मिळत आहे. मात्र भारताने देखील SPADEX आणि मिशन शक्ती (ASAT) द्वारे स्वतःची अंतराळातील युद्धसज्जता स्पष्ट केली आहे.
चीनने अलीकडेच LEO (Low Earth Orbit) मध्ये ‘डॉगफाइट’ युद्धाभ्यास केला आहे. एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांच्या मते, हा सराव फक्त गुप्तचर देखरेखीसाठी नव्हता, तर प्रत्यक्ष अवकाशात लढाई करण्याची तयारी होती. या मोहिमेत चीनने शत्रू उपग्रहांचा मागोवा घेणे, त्यांना अडवणे आणि निष्क्रिय करणे या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले.
एप्रिल 2024 मध्ये चीनने स्वतःची ‘ऑटोनॉमस एअरोस्पेस फोर्स’ स्थापन केली, जी थेट CMC (Central Military Commission) ला अहवाल देते. या फोर्सचा उद्देश उपग्रहांवर हल्ले करणे, त्यांना अकार्यक्षम करणे आणि अवकाशातील वर्चस्व मिळवणे असा आहे. चीनने या क्षमतेसह LEO मध्ये शस्त्र बसवलेल्या ३६० ISR (Intelligence, Surveillance, Reconnaissance) उपग्रहांची तैनाती केली आहे. साल २०१० मध्ये केवळ ३६ उपग्रह असलेल्या चीनकडे २०२४ पर्यंत १००० हून अधिक उपग्रह झाले असून त्यातील बहुसंख्य लष्करी उद्दिष्टांसाठी कार्यरत आहेत. त्यामुळे अवकाश हीच पुढील युद्धभूमी बनणार आहे, हे स्पष्ट होत आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘Project Pelican’मुळे खळबळ; भारताविरुद्ध खलिस्तानी समर्थक, ISI आणि ड्रग्ज नेटवर्कचा भयंकर कट उघड
भारताने देखील अशा आक्रमक हालचालींना तितक्याच ताकदीने उत्तर दिले आहे. ISRO आणि DRDO यांच्या नेतृत्वाखाली भारताने अत्याधुनिक अंतराळ प्रयोग केले आहेत. त्यामध्ये सर्वात उल्लेखनीय म्हणजे SPADEX (Space Docking Experiment) मोहिम. या अंतर्गत भारताने दोन उपग्रहांना 29,000 किमी/तास वेगाने अंतराळात जवळ आणून स्वयंचलित डॉकिंग आणि अनडॉकिंग करण्यात यश मिळवले. हे तंत्रज्ञान भविष्यात ऑन-ऑर्बिट दुरुस्ती, अंतराळ स्थानकांचे स्थापत्य, तसेच युद्धकाळात उपग्रहांना मदत करण्यासाठी आवश्यक ठरणार आहे. अशा प्रकारे भारत अंतराळ तंत्रज्ञानात केवळ प्रगती करत नाही, तर रणनीतिक सज्जता देखील वाढवत आहे.
२७ मार्च २०१९ रोजी भारताने मिशन शक्ती (ASAT – Anti Satellite Test) अंतर्गत, ३०० किमी उंचीवर असलेल्या स्वतःच्या उपग्रहाला डायरेक्ट-अॅसेंट कायनेटिक किल वेपनने पाडले. हे यश मिळवणारा भारत हा चौथा देश ठरला. अमेरिका, रशिया आणि चीननंतर. ASAT मुळे भारताकडे आता शत्रूच्या उपग्रहांना उडवण्याची थेट क्षमता आहे, जी भविष्यातील युद्धांमध्ये निर्णायक ठरू शकते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताचे चीनशी संबंध का चांगले नाहीत? परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी एका ओळीत दिले उत्तर
चीनच्या डॉगफाइट युद्धाभ्यासांनी आणि भारताच्या SPADEX-ASAT क्षमतांनी हे स्पष्ट झाले आहे की, 21व्या शतकातील युद्धे जमिनीवर नव्हे तर संगणक स्क्रीन, कक्षीय मार्ग आणि उपग्रह सिग्नलवर लढली जाणार आहेत. भारत-चीनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, अवकाशात सुरू असलेल्या या शस्त्रीकरणाच्या स्पर्धेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. भारताने दाखवलेली स्वावलंबी क्षमता आश्वासक आहे, पण भविष्यातील युद्धासाठी अधिक रणनीती, तंत्रज्ञान आणि जागतिक सहकार्याची आवश्यकता आहे. अवकाश आता केवळ संशोधनाची जागा न राहता, सुरक्षिततेचा किल्ला बनला आहे — आणि भारत त्या लढाईसाठी सज्ज आहे.