नवी दिल्ली : भारतात दहशतवाद्यांकडून आत्तापर्यंत अनेक मोठ्या कारवाया करण्यात आल्या आहेत. असे असताना भारत दहशतवादाविरोधात (Terrorist Attack) आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. त्यानुसारच, भारताने पठाणकोट-पुलवामा (Pathankot-Pulwama Attack) हल्ल्यातील आरोपी अब्दुल रौफला (Terrorist Abdul Rauf) काळ्या यादीत टाकण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रसंघात (United Nation) सादर केला. मात्र, त्याला चीनकडून विरोध केला जात आहे.
आत्तापर्यंत पाकिस्तानकडून भारताविरोधात भूमिका घेतल्या जात होत्या. त्यात पाकिस्तानच्या दहशतवाद्यांकडूनच भारतात कारवाया केल्या गेल्या. मात्र, आता चीन भारताविरोधात भूमिका घेताना दिसत आहे. दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ अब्दुल रौफ अझहर याला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) काळ्या यादीत टाकण्याची मागणी भारताने पुन्हा केली. मात्र, चीनने यावर आक्षेप घेतला.
अमेरिकेने ठेवला होता प्रस्ताव
गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये भारत आणि अमेरिकेने अब्दुल रौफला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तेव्हाही चीनने व्हेटो पॉवर वापरून ते थांबवले होते. त्यावेळी चीनने हे प्रकरण समजून घेण्यासाठी वेळ हवा असल्याचे म्हटले होते. नंतर हा प्रस्ताव रखडला. मात्र, या प्रस्तावाला UNSC च्या उर्वरित 14 सदस्यांचा पाठिंबा होता. त्यानंतर आता भारताने पुन्हा ही मागणी केली आहे. पण चीन यामध्ये खोडा घालण्याचे काम करत आहे.
2010 मध्ये अमेरिकेकडून रौफ दहशतवादी घोषित
अमेरिकेने रौफवर 2010 मध्ये निर्बंध लादले होते. त्याच्यावर दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग आणि भारतात आत्मघाती हल्ले घडवून आणल्याचा आरोप आहे. यानंतर रौफला जागतिक दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राकडे पाठवण्यात आला, मात्र चीन प्रत्येक वेळी पाकिस्तानला पाठिंबा देत मागे हटतो.