China's deep-sea cable cutter sparks global internet security fears
बीजिंग : चीनने विकसित केलेल्या अत्याधुनिक ‘डीप सी’ केबल कटरमुळे जागतिक इंटरनेट आणि डेटा सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे. हे उपकरण समुद्राखालील महत्त्वाच्या कम्युनिकेशन आणि पॉवर केबल्स सहजपणे कापण्यास सक्षम आहे, ज्यामुळे संपूर्ण जगाच्या इंटरनेट नेटवर्कला धोका निर्माण होऊ शकतो.
चीनच्या संशोधन संस्थांचा सहभाग
हे नवीन तंत्रज्ञान चीनच्या शिप सायंटिफिक रिसर्च सेंटर (CSSRC) आणि खोल समुद्रातील मानवयुक्त वाहनांच्या राज्य प्रयोगशाळेने विकसित केले आहे. अधिकृतरित्या, या उपकरणाचा उपयोग खोल समुद्रातील खाणकाम आणि संशोधनासाठी करण्यात आला असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या तंत्रज्ञानाचा द्वैतीय उपयोग (Dual-use Technology) करून चीन युद्धसदृश्य परिस्थितीत शत्रू राष्ट्रांचे महत्त्वाचे कम्युनिकेशन नेटवर्क उद्ध्वस्त करू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ट्रम्प यांचा आणखी एक धक्कादायक निर्णय; निवडणूक प्रक्रियेत मोठा बदल
केबल कटरची क्षमता आणि कार्यप्रणाली
हे अत्याधुनिक उपकरण ४,००० मीटर खोल समुद्रात कार्य करण्यास सक्षम आहे. विशेषतः, समुद्राच्या तळाशी टाकलेल्या स्टीलच्या मजबूत आणि संरक्षित केबल्स सहजगत्या कापण्याची क्षमता त्यात आहे. जगभरातील ९५% इंटरनेट आणि डेटा ट्रान्समिशन या समुद्राखालच्या केबल्सवर अवलंबून असते. त्यामुळे जर या केबल्समध्ये अडथळा निर्माण झाला, तर संपूर्ण इंटरनेट सेवा ठप्प होऊ शकते.
या उपकरणामध्ये डायमंड-लेपित ग्राइंडिंग व्हील बसवलेले आहे, जे १६०० RPM वेगाने फिरते आणि प्रबलित स्टील केबल्सही सहजगत्या कापू शकते. याशिवाय, हे उपकरण खोल समुद्रातील ४०० एटीएम दाबाखालीही कार्य करू शकते, त्यामुळे समुद्राच्या खोल पाण्याचा कोणताही परिणाम त्याच्या कार्यक्षमतेवर होत नाही.
संभाव्य धोका आणि चीनचा हेतू
आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मते, चीन हे उपकरण तैवानजवळील समुद्राखालच्या केबल्स नष्ट करण्यासाठी वापरू शकतो. जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर सर्वप्रथम या केबल्स तोडून तैवानच्या दळणवळण यंत्रणेला मोठा धक्का देण्याची शक्यता आहे. याशिवाय, चीन गुआम किंवा इतर अमेरिकी लष्करी तळाजवळ याचा वापर करू शकतो, जेथे अमेरिकेच्या दळणवळण आणि सैन्य हालचालींच्या व्यवस्थापनावर मोठा परिणाम होऊ शकतो.
युरोपियन आणि पाश्चात्य देशांची चिंता
युरोप आणि अमेरिका यासंदर्भात विशेष चिंतित आहेत. कार्नेगी एन्डॉमेंट या नामांकित अमेरिकन थिंक टँकच्या मते, चीनने जर जागतिक स्तरावर समुद्राखालच्या केबल्समध्ये हस्तक्षेप केला, तर जागतिक आर्थिक बाजारावर गंभीर परिणाम होईल. तसेच, या संकरित युद्धतंत्रामुळे (Hybrid Warfare) चीनला थेट दोषी ठरविणेही कठीण ठरेल.
चीनची अधिकृत प्रतिक्रिया
या आरोपांवर चीनने नेहमीप्रमाणेच कोणतीही स्पष्ट कबुली दिलेली नाही. चीनच्या अधिकाऱ्यांनी याआधीही असे तंत्रज्ञान संरक्षण आणि वैज्ञानिक संशोधनासाठी विकसित केल्याचे म्हटले आहे. मात्र, या उपकरणाच्या वापरासंदर्भात कोणत्याही जागतिक संहिता किंवा कायद्याचे पालन केले जाणार का? यावर अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘भारतीय सैनिकांना काढून टाकणे हा चुकीचा निर्णय…’ मालदीवचे माजी राष्ट्रपती नशीद यांनी का केले असे वक्तव्य?
जागतिक इंटरनेट सुरक्षेसमोरील आव्हान
जागतिक महासागरात टाकलेल्या केबल्सद्वारेच जगभरातील बँकिंग, सुरक्षा, संवाद, व्यापार आणि डिजिटल व्यवहार पार पडतात. त्यामुळे चीनच्या या नव्या तंत्रज्ञानामुळे जागतिक इंटरनेट सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात याचा कोणत्या प्रकारे उपयोग केला जातो, यावर आंतरराष्ट्रीय संबंध आणि सुरक्षितता अवलंबून राहणार आहे.