NASA JWST lunar collision odds : अवकाशात एक अत्यंत दुर्मीळ व विलक्षण घटना घडण्याची शक्यता आहे. वैज्ञानिकांच्या निरीक्षणानुसार २०२४ YR4 नावाचा एक लघुग्रह २०३२ मध्ये चंद्रावर आदळू शकतो. सध्या हा संभाव्य लघुग्रही धक्का चर्चेचा आणि अभ्यासाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याच्या आदळण्याची शक्यता वाढल्याने ही घटना शास्त्रज्ञांसाठी प्रयोगशाळेतील मोठ्या प्रयोगासारखी ठरणार आहे.
काय आहे २०२४ YR4?
२०२४ YR4 हा ५३ ते ६७ मीटर व्यासाचा एक खगोलीय पिंड आहे. तज्ज्ञांच्या मते, त्याचा आकार १९०८ मध्ये रशियाच्या तुंगुस्का प्रदेशात घडलेल्या भीषण लघुग्रही विस्फोटाइतका आहे, ज्यात संपूर्ण जंगल नष्ट झाले होते. त्यामुळे त्याला ‘सिटी किलर’ असेही संबोधले जात आहे, कारण हा लघुग्रह पृथ्वीवर आदळला असता तर संपूर्ण शहर नष्ट होण्याची शक्यता होती. सुदैवाने, शास्त्रज्ञांनी स्पष्ट केले आहे की हा लघुग्रह आता पृथ्वीऐवजी चंद्राच्या दिशेने सरकत आहे, त्यामुळे मानवी जीवनाला सध्या कोणताही धोका नाही.
टक्कर होण्याची शक्यता वाढली
फेब्रुवारी २०२५ पर्यंत २०२४ YR4 चंद्रावर आदळण्याची शक्यता ३.८% होती. मात्र, मे २०२५ मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप (JWST) कडून मिळालेल्या नव्या निरीक्षणानंतर ही शक्यता ४.३% वर पोहोचली आहे. ही वाढ काहीशी लक्षणीय मानली जात असून, त्यामुळे या संभाव्य टक्करविषयी शास्त्रज्ञ अधिक सजग झाले आहेत.
शास्त्रीय अभ्यासासाठी महत्त्वाची संधी
जर ही टक्कर घडली, तर ती चंद्राच्या पृष्ठभागावर एक नवीन मोठा खड्डा निर्माण करू शकते. हा खड्डा शास्त्रज्ञांसाठी अनेक अभ्यासांच्या दृष्टीने उपयुक्त ठरेल. या प्रयोगामुळे खालील बाबींचा सखोल अभ्यास शक्य होईल:
1. लघुग्रहांच्या टक्करवेळी निर्माण होणारी उर्जा आणि वेग
2.चंद्राच्या पृष्ठभागाची संरचना आणि प्रतिसाद
3. खगोलीय टक्करींचा वैश्विक परिणाम
या प्रकल्पाचे नेतृत्व जॉन्स हॉपकिन्स अप्लाइड फिजिक्स लॅबोरेटरीचे अँडी रिव्हकिन करत आहेत. त्यांनी स्पष्ट केले आहे की, ही टक्कर चंद्रासाठी कोणतेही कायमस्वरूपी नुकसान करणार नाही, तसेच चंद्राच्या कक्षेत कोणताही बदल होणार नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : China Space Warfare : चीनने अवकाशातही सैन्य उभारले, 360 उपग्रहांमध्ये बसवली शस्त्रे, भारतही सज्ज
सामान्य लोकांसाठीही एक चमत्कार
जर ही टक्कर प्रत्यक्ष घडली, तर ती दुर्बिणीद्वारे पाहता येईल, आणि कदाचित तिचे थेट प्रक्षेपण टीव्ही व इंटरनेटवरही दाखवले जाईल. त्यामुळे केवळ वैज्ञानिक दृष्टिकोनातूनच नव्हे, तर सामान्य लोकांसाठीही ही घटना एक चमत्कार आणि अवकाशाविषयीचा कुतूहल वाढवणारी संधी ठरणार आहे.
२०२८ मध्ये अधिक अचूक माहिती मिळणार
सध्या २०२४ YR4 पृथ्वीपासून खूप दूर आहे, त्यामुळे त्याच्या कक्षेबाबत निश्चित अंदाज बांधणे कठीण आहे. परंतु, २०२८ मध्ये हा लघुग्रह पुन्हा पृथ्वीच्या जवळ येईल, तेव्हा खगोलशास्त्रज्ञ त्याचे मार्ग आणि गती याचे अधिक अचूक विश्लेषण करू शकतील. त्यामुळे २०३२ मध्ये चंद्रावर टक्कर होणार की नाही हे स्पष्ट होईल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानवर घोंगावतंय आणखी एक संकट; रावळपिंडी असो वा कराची, कुठेही होऊ शकतो घातक हल्ला
एक ऐतिहासिक खगोलीय प्रयोग
२०२४ YR4 चंद्रावर आदळण्याची शक्यता ही फक्त एक विनाशकारी घटना नसून, वैज्ञानिक दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक प्रयोग ठरू शकतो. हा क्षण खगोलशास्त्र, अवकाश सुरक्षा, आणि मानवी जिज्ञासेसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे. जगाच्या नजरा आता २०३२ च्या त्या एका टप्प्यावर खिळलेल्या आहेत.