Despite the Israel-Hamas conflict and boycott global demand for Israeli dates surged especially during Ramadan
तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरातील मुस्लिम देशांनी इस्रायलविरोधात कडवा विरोध दर्शवला आहे. अनेक देशांनी इस्रायली उत्पादनांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. मात्र, रमजानच्या पार्श्वभूमीवर इस्रायली खजुरांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असून, मुस्लिम देशांमध्येही या खजुरांची विक्री जोरात सुरू आहे.
इस्रायल-हमास संघर्ष आणि त्याचा व्यापारी परिणाम
इस्रायल पॅलेस्टाईनवर आक्रमण करत असून, आतापर्यंत 50,000 पेक्षा अधिक पॅलेस्टिनी नागरिक या संघर्षात मारले गेले आहेत. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखाली इस्रायली सैन्य गाझा पट्टीत मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई करत आहे. मुस्लिम राष्ट्रांनी या युद्धाचा तीव्र निषेध नोंदवला असला तरी, इस्रायली खजुरांच्या विक्रीवर त्याचा फारसा परिणाम झालेला नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : अमेरिकेने ताबा घेतल्यांनंतर ‘असा’ दिसेल गाझा; ट्रम्प यांनी जारी केला AI व्हिडिओ, नेटकरी मात्र संतापले
इस्रायली खजुरांना विशेष मागणी
मध्यपूर्व आणि आफ्रिकन देश हे खजुरांचे सर्वांत मोठे उत्पादक आहेत. स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, जगभरात दरवर्षी सुमारे 9.6 दशलक्ष मेट्रिक टन खजूर उत्पादित होतात. मात्र, इस्रायली खजुरांना वेगळे स्थान आहे. ते तुलनेने कमी गोड, अधिक मऊ आणि उत्तम प्रतीचे असल्याने जगभरातील बाजारपेठांमध्ये त्यांना विशेष मागणी आहे. इस्रायलमध्ये दरवर्षी सुमारे 40 टन खजुरांचे उत्पादन होते आणि रमजानच्या काळात त्यांची विक्री उच्चांक गाठते. 2024 मध्ये मुस्लिम देशांनी इस्रायली खजुरांवर बहिष्कार घालण्याचा प्रयत्न केला होता, परंतु 2025 मध्ये त्यांच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे.
जागतिक बाजारपेठेत इस्रायली खजुरांचे वर्चस्व
स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार, इस्रायल दरवर्षी सुमारे 2300 कोटी रुपयांचे खजूर निर्यात करतो. इस्रायली खजुरांना दुबई, अमेरिका, फ्रान्स, भारत, चीन आणि थायलंडमध्ये मोठी मागणी आहे. फ्रेशप्लाझाच्या अहवालानुसार, इस्रायलने 2025 च्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणावर दुबई, अमेरिका आणि फ्रान्सला खजुरांची निर्यात केली आहे. इस्रायली कंपन्या 5 किलोच्या पॅकमध्ये खजूर विकत असून, संपूर्ण स्टॉक रमजानपूर्वी विकण्याची त्यांची योजना आहे.
बहिष्काराचे आवाहन झालं नाही, विक्री सुरळीत सुरू
गेल्या वर्षी पॅलेस्टाईनसमर्थक संघटनांनी जगभरातील मुस्लिमांना इस्रायली खजुरांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. इस्रायलला आर्थिक इजा पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, 2025 मध्ये असे कोणतेही आवाहन करण्यात आलेले नाही. यामुळे इस्रायली खजुरांची विक्री वाढली असून, मुस्लिम देशही मोठ्या प्रमाणावर हे खजूर खरेदी करत आहेत. विशेषतः रमजानमध्ये खजुरांची मागणी प्रचंड वाढत असल्याने, इस्रायलला यंदा विक्रीत विक्रमी नफा होण्याची शक्यता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘अशा भारतीयांनीच अमेरिकेत यावे…’ ट्रम्प यांची Gold Card योजना बनणार भारतीयांसाठी मोठे आव्हान
इस्रायली खजुरांचा जागतिक व्यापार कायम
मुस्लिम देश इस्रायलविरोधात राजकीय पातळीवर विरोध करत असले तरी, इस्रायली खजुरांच्या व्यापारावर त्याचा परिणाम झालेला नाही. जगभरातील ग्राहक इस्रायली खजुरांची चव आणि गुणवत्ता पसंत करत असल्याने, त्यांच्या विक्रीत सातत्याने वाढ होत आहे. विशेष म्हणजे, रमजानच्या काळात इस्रायली खजुरांची विक्री सर्वाधिक होते आणि यंदाही तीच स्थिती राहील, असा अंदाज वर्तवला जात आहे.