
Donald Trump यांची नोबेलची इच्छा अधुरी? भारतीय वंशाच्या नावी पिल्लई यांना शांततेचा पुरस्कार जाहीर!
भारतीय वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ नवनेथम ‘नावी’ पिल्लई यांना २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे. शांतता आणि आंतरराष्ट्रीय कायद्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत नॉर्वेजियन नोबेल समितीने शुक्रवारी (९ ऑक्टोबर) ही घोषणा केली.
युद्धगुन्हे, मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि नरसंहाराच्या प्रकरणांमध्ये दोषींना कायद्याच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा समितीने गौरव केला आहे. दरम्यान, अनेक युद्ध रोखल्याचे कारण देत शांततेचा नोबॅल पुरस्कार मागणाऱ्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump ) यांची झोळी यंदाही रिकामीच राहिली असे चित्र आहे.
नोबेल समितीच्या मते, नावी पिल्लई यांनी असामान्य धैर्य आणि प्रामाणिकपणाच्या जोरावर जागतिक कायदेव्यवस्था अधिक व्यापक आणि मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांनी देश आणि राष्ट्रीय नेत्यांना त्यांच्या कृतींसाठी जबाबदार धरण्याच्या भूमिकेला बळ दिले. हिंसा आणि संघर्षातील पीडितांना न्यायाची आशा मिळवून देण्यातही त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.
नावी पिल्लई यांचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील डरबन येथे भारतीय तमिळ वंशाच्या कुटुंबात वर्णभेदाच्या काळात झाला. सामाजिक भेदभाव, वांशिक विभाजन आणि बहिष्कार अशा आव्हानांचा सामना करत त्यांनी कायद्याचे शिक्षण घेतले आणि वकिली क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वर्णभेदाविरोधात लढणारे नेल्सन मंडेला आणि अन्य कार्यकर्त्यांची बाजू मांडण्यापासून त्यांच्या न्यायासाठीच्या संघर्षाला सुरुवात झाली.
पुढे त्यांनी दक्षिण आफ्रिकेच्या उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केले. रवांडासाठीच्या आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरणात त्यांनी न्यायाधीश आणि अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयातही त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले. २००८ ते २०१४ या काळात त्या संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्त होत्या.
अरेरे, काय चाललंय Nepal मध्ये, आता शाळेची बस दरीत कोसळून विद्यार्थ्यांसह पाच जणांचा मृत्यू
रवांडातील ऐतिहासिक खटल्यांमध्ये लैंगिक हिंसा आणि बलात्कार हे मानवतेविरुद्धचे गुन्हे तसेच नरसंहाराचे कृत्य ठरू शकतात, हे प्रस्थापित करण्यात नावी पिल्लई यांची महत्त्वाची भूमिका होती. नरसंहाराला चिथावणी देणाऱ्या प्रचाराच्या संदर्भातील कायदेशीर घडामोडींमध्येही त्यांचे योगदान राहिले आहे.
२०२१ ते २०२५ या काळात त्यांनी व्यापलेल्या पॅलेस्टिनी प्रदेशावरील संयुक्त राष्ट्रांच्या स्वतंत्र आंतरराष्ट्रीय चौकशी आयोगाचे अध्यक्षपद सांभाळले. तसेच, म्यानमारवर नरसंहाराचा आरोप असलेल्या प्रकरणात त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात तदर्थ न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत.
आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संस्थांना अधिक सक्षम करणे, युद्धगुन्ह्यांसाठी जबाबदार व्यक्तींवर कारवाई होण्यासाठी कायदेशीर व्यवस्था मजबूत करणे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करणे, या क्षेत्रांतील त्यांच्या योगदानाची नोबेल समितीने प्रशंसा केली आहे. न्याय आणि मानवी हक्कांप्रती त्यांची बांधिलकी शांततापूर्ण जग निर्माण करू इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे समितीने म्हटले आहे.
जगातील सर्वात घातक असे अनेक देशांतील युद्ध आपण रोखल्याचा दाखला देत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे आपणास शांततेचं नोबलं मिळावं अशी मागणी करत होते. यंदा त्यांचं स्वप्न पूर्ण होईल अशी त्यांना अपेक्षा होता, मात्र नावी पिल्लई यांचे नाव घोषित होताच, याही वर्षी त्यांची इच्छा अधुरीच राहिल्याचे चित्र निर्माण झाले.