Floods wreak havoc in Nepal 112 people dead many missing hundreds of houses under water
काठमांडू : पुरामुळे नेपाळमध्ये हाहाकार माजला आहे. आतापर्यंत 112 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, काठमांडू, ललितपूर आणि इतर भागात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. नद्यांच्या काठावर वसलेल्या भागात मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. घरे उद्ध्वस्त झाली असून जीवितास धोका वाढला आहे. नेपाळमध्ये संततधार पावसामुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनात किमान 112 लोकांचा मृत्यू झाला आणि 60 जण जखमी झाले. नेपाळच्या अनेक भागात गुरुवारपासून मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे आपत्ती अधिकाऱ्यांनी अचानक पूर येण्याचा इशारा दिला आहे.
नेपाळचे शहरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून शोध आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. ते म्हणाले की, ‘नेपाळ पोलिसांनी बाधित भागात सुमारे तीन हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बचाव पथक तैनात केले आहे.’
नेपाळमध्ये पुराचा कहर; 112 लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता, शेकडो घरे पाण्याखाली ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
नेपाळ पोलिसांचे म्हणने आहे की, सततच्या पावसामुळे नेपाळमध्ये आतापर्यंत 112 लोकांचा मृत्यू झाला आहे, त्यापैकी 34 जण काठमांडू खोऱ्यात मरण पावले आहेत. पुरात 60 जण जखमी झाल्याचेही त्यांनी सांगितले. तर डझनभर लोक बेपत्ता आहेत.
काठमांडू खोऱ्यात 16 जण बेपत्ता
देशभरात एकूण 79 लोक बेपत्ता आहेत. त्यापैकी 16 काठमांडू खोऱ्यात बेपत्ता आहेत. तीन हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचले असल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, देशभरात 63 ठिकाणी मुख्य महामार्ग ठप्प झाले आहेत.
हे देखील वाचा : 5 दिवसात उध्वस्त झाली जगातील सर्वात बलाढ्य संघटना हिजबुल्लाह; ‘असा’ होता नेतन्याहूंचा मास्टरप्लॅन
मंत्र्यांची तातडीची बैठक
दरम्यान काळजीवाहू पंतप्रधान आणि शहरी विकास मंत्री प्रकाश मान सिंह यांनी गृहमंत्री, गृह सचिव आणि सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांसह विविध मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावून शोध आणि बचाव कार्याला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. सरकारने नेपाळमधील सर्व शाळा तीन दिवस बंद ठेवण्याचे आणि सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचे आदेश दिले आहेत.
हे देखील वाचा : सूर्य पृथ्वीला गिळंकृत करणार! ‘असा’ होणार आपल्या सूर्याचा अंत, शास्त्रज्ञांचा खुलासा
काठमांडूमध्ये दिवसभर वीज खंडित
पुरामुळे मुख्य वीजवाहिन्या खंडित झाल्यामुळे काठमांडूमध्ये दिवसभर वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र संध्याकाळी वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. पावसामुळे झालेल्या भूस्खलनामुळे काठमांडूमध्ये प्रवेश करण्याचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी सांगितले की, काठमांडूमध्ये 226 घरे पाण्याखाली गेली आहेत आणि बाधित भागात नेपाळ पोलिसांनी सुमारे तीन हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे बचाव पथक तैनात केले आहे.