
barack obama
वॉशिंगटन : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान, अमेरिकेच्या संसदेला त्यांनी संबोधित केले. या दौऱ्यात त्यांना अमेरिकेतील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. पण असे असताना माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barak Obama) यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली. त्यांनी मोदींची तुलना थेट चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीच केली.
बराक ओबामा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, अमेरिका आणि जगभरातील लोकशाही संस्था डळमळीत झाल्या आहेत आणि भविष्यात त्या जतन करण्याचे मार्ग शोधणे हे अमेरिकन नेत्यांवर अवलंबून आहे. जागतिक लोकशाही आणि राजकीय मुद्द्यांवर त्यांनी भारत आणि चीनच्या विरोधात भाष्य केले. ओबामा म्हणाले की, हुकूमशहा किंवा इतर अलोकशाही नेत्यांना भेटणे हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या कठीण पैलूंपैकी एक आहे. मला माझ्या पदाच्या कार्यकाळात मला अशा अनेक लोकांशी सामना करावा लागला होता, ज्यांच्याशी मी सहमत नव्हतो.
अल्पसंख्यांक मुस्लिमांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावे
ओबामा म्हणाले की, पंतप्रधान मोदींसोबत हवामान बदल आणि इतर क्षेत्रांवर काम केले आहे. पण, भारतीय लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करणे हाही राजनैतिक संभाषणाचा भाग असावा, असे ते म्हणाले. हिंदू बहुसंख्य भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांच्या सुरक्षेकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.