
generation z mexico youth raise voices for reforms and civic change
1. मेक्सिकोमध्ये जनरेशन-झेड तरुणांचे गुन्हेगारी, भ्रष्टाचार आणि सरकारी धोरणांविरोधातील आंदोलन तीव्र, हजारोंचा रस्त्यावर जमाव.
2. मिचोआकानच्या महापौर कार्लोस मांझो यांच्या हत्येनंतर देशभरात संताप; पोलिस-निदर्शकांमधील संघर्षात अनेक जखमी, अटक.
3. राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्यावर ड्रग्ज कार्टेलशी संगनमताचे आरोप; त्यांच्या नेतृत्वावर देशभरातून प्रश्नचिन्ह.
Generation Z protests Mexico : नेपाळमधील राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आता मेक्सिकोतही (Mexico) जनरेशन-झेड ( Gen Z) तरुणांच्या आंदोलनाची धग प्रचंड वाढत आहे. वाढत्या गुन्हेगारी दरावर, भ्रष्टाचारावर आणि सरकारी धोरणांवर तीव्र असंतोष व्यक्त करत देशभरातील हजारो युवक रस्त्यावर उतरले आहेत. मेक्सिकोच्या राजकीय इतिहासात एवढ्या मोठ्या प्रमाणात तरुणांचा सहभाग दुर्मीळ मानला जातो. परंतु, मिचोआकानच्या महापौर कार्लोस मांझो यांच्या हत्येनंतर सुरू झालेल्या आंदोलनांनी आता सरकारलाच थेट आव्हान दिले आहे.
मेक्सिको सिटीसह अनेक मोठ्या शहरांत सुरू असलेल्या आंदोलनांना शनिवारच्या मोर्चात व्यापक रूप मिळाले. विविध वयोगटांतील नागरिक उतरले, ज्यात वृद्ध विरोधी कार्यकर्ते, युवा विद्यार्थी, तसेच महापौर मांझो यांचे समर्थकही होते. कार्लोस मांझो यांच्या निर्घृण हत्येने जनतेचा रोष उसळला आहे. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरुद्ध ठामपणे उभे राहिलेल्या महापौरांच्या हत्या प्रकरणाने तरुणांच्या मनातील आक्रोश अधिकच तीव्र केला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine war : गाझा संकट सोडवण्याची मोठी हालचाल; Putin-Netanyahu यांच्यात इराण संबंधित सिक्रेट फोन चर्चा
मेक्सिकन माध्यमांच्या वृत्तानुसार, मेक्सिको सिटीतील राष्ट्रीय राजवाड्याभोवती उभारलेल्या बॅरिकेड्स निदर्शकांनी तोडले. त्यानंतर त्यांनी राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्या निवासस्थानाजवळ घोषणाबाजी केली. तणाव वाढल्यानंतर पोलिसांनी अश्रुधुराचा मारा केला. यामुळे जमाव भडकला आणि दोन्ही बाजूंमध्ये मोठा संघर्ष झाला. दगडफेक, ढालींचा वापर आणि धक्काबुक्की झाली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या संघर्षात १०० हून अधिक पोलीस जखमी झाले असून ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर २० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले आहे.
Thousands take to the streets in Mexico City for ‘Gen Z’ protests crime and corruption https://t.co/Z34lZ6LKTR pic.twitter.com/0s6p84fxi9 — New York Post (@nypost) November 16, 2025
credit : social media
सार्वजनिक सुरक्षा सचिव पाब्लो वाझक्वेझ यांनी सांगितले की, २० निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. शिवाय आणखी २० जणांवर प्रशासकीय गुन्ह्यांचे आरोप ठेवण्यात आले आहेत. परंतु, जनरेशन-झेड तरुणांचा आक्रोश एवढ्यावर थांबलेला नाही.
आंदोलनातील युवक राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शीनबॉम यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. त्यांनी ड्रग्ज कार्टेलशी संगनमत केल्याचा आरोप जनतेतून सातत्याने ऐकू येत आहे. अमेरिकेच्या धोरणांविरोधात ठाम भूमिका घेणाऱ्या आणि व्हेनेझुएलासाठी उभ्या राहिलेल्या या राष्ट्राध्यक्षांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिमा उंचावली होती. मात्र, देशातील वाढत्या हिंसाचाराने आणि उच्च-प्रोफाइल हत्यांनी त्यांच्या सुरक्षा धोरणांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.
ऑक्टोबर २०२४ मध्ये सत्तेवर आलेल्या शीनबॉम यांनी पहिल्या वर्षात ७०% पेक्षा जास्त लोकप्रियता टिकवून ठेवली होती. पण, कार्लोस मांझो यांच्या हत्येने जनतेचा विश्वास डळमळीत केला आहे. देशातील सुरक्षा यंत्रणांची अक्षमता, वाढते गुन्हे आणि मादक पदार्थांच्या टोळ्यांची वाढती ताकद यामुळे जनतेच्या मनात संताप उफाळला आहे.
मेक्सिकन वृत्तसंस्था एल युनिव्हर्सलने दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी निदर्शकांना रोखताना अश्रुधुराचा वापर केला. काही ठिकाणी दगडफेक झाली. अनेक युवक जखमी झाले आणि त्यांना आपत्कालीन पथकांनी उपचार दिले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Russia Ukraine War : युक्रेनमध्ये ‘हिरो पिग’ने वाचवले रशियन सैनिकांचे प्राण; अविश्वसनीय घटना VIRAL
नेपाळनंतर आता मेक्सिकोतील तरुण सत्ताबदलाची मागणी करत आहेत. त्यांचे स्पष्ट म्हणणे आहे की देशात भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि ड्रग्ज टोळ्यांच्या राजवटीविरुद्ध निर्णायक पाऊल उचललेच पाहिजे. सरकारने तातडीने कठोर पावले उचलली नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. मेक्सिकोची तरुण पिढी सध्या ज्या पद्धतीने उद्रेकत आहे, ते येत्या राजकीय घडामोडींना नवे वळण देऊ शकते.