नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या टँकरचा मोठा स्फोट; 31 जणांचा मृत्यू
नायजर : आफ्रिकन देशांत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. एक नायजेरियात तर दुसरी घटना इथिओपियामध्ये घडली. नायजेरियात पेट्रोल घेऊन जाणाऱ्या ट्रकचा मोठा स्फोट झाला. यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला तर पूर्व इथिओपियामध्ये दोन रेल्वेगाड्यांची एकमेकांना जोरदार धडक होऊ अपघात झाला. यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या दिली जात आहे.
पूर्व इथिओपियामध्ये सोमवारी रात्री एका ट्रेनची थांबलेल्या दुसऱ्या ट्रेनशी धडक झाली, ज्यामध्ये किमान 14 जण ठार झाले आणि डझनभर जखमी झाले. व्यापारी आणि त्यांचा माल घेऊन जाणारी ट्रेन जिबूती सीमेजवळील देवाले शहरातून परतत असताना डायर डाव शहराजवळ हा अपघात झाला. अपघातानंतर जखमींना मदत पोहोचण्यास उशीर झाल्याचे आता सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अपघातग्रस्तांना डब्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
दुसऱ्या एका अपघातात, मंगळवारी नायजर राज्यातील बिदा प्रदेशात पेट्रोल वाहून नेणाऱ्या टँकर ट्रकचा स्फोट झाला, ज्यामध्ये 31 जणांचा मृत्यू झाला असून, १७ जण जखमी झाले आहेत. टँकर पटली झाल्यानंतर स्थानिक लोक सांडलेले इंधन गोळा करण्यासाठी धावले तेव्हा स्फोट झाला. यामध्ये जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही महिन्यांत नायजर राज्यात जड वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाली आहे, ज्याचे कारण खराब रस्ते आणि रेल्वे नेटवर्कचा अभाव असल्याचे सांगण्यात येत आहे. हे राज्य उत्तर आणि दक्षिण नायजेरिया दरम्यान एक प्रमुख मालवाहतूक केंद्र आहे.
अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरु
पोलिसांनी सांगितले की, या अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरु आहे. टँकर चालक, टँकर मालक यांचाही सध्या शोध घेतला जात आहे. उमरू बागो यांनी ही घटना ‘दुःखद आणि वेदनादायक’ असल्याचे म्हटले आहे. यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या नातेवाईकांचे त्यांनी सांत्वन केले.