india canada relations renewed after 10 months carney opens new chapter
India Canada Ties : भारत आणि कॅनडा या दोन लोकशाही देशांमधील संबंध गेल्या वर्षभरात अभूतपूर्व तणावाच्या भोवर्यात सापडले होते. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येनंतर कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर थेट बोट ठेवले आणि संबंधांमध्ये मोठी दरी निर्माण झाली. पण आता, अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, नव्या पंतप्रधान मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखाली कॅनडा भारताशी संवादाचे नवे दरवाजे उघडताना दिसत आहे.
जून २०२३ मध्ये कॅनडातील ब्रिटिश कोलंबियामधील सरे येथे हरदीप सिंग निज्जरची गोळ्या घालून हत्या झाली. निज्जर हा भारताने २०२० मध्ये दहशतवादी घोषित केलेला होता. घटनेनंतर ट्रुडो यांनी सार्वजनिकरित्या असा दावा केला की, या हत्येमागे भारतीय गुप्तचर संस्थांचा हात आहे आणि त्यांच्याकडे “विश्वसनीय पुरावे” आहेत.
भारताने हे आरोप फेटाळून लावले आणि पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. मात्र, ट्रुडो सरकार शेवटपर्यंत ठोस पुरावे मांडू शकले नाही. उलट भारताने कॅनडावर “खलिस्तानी फुटीरतावाद्यांना आश्रय देण्याचा” आरोप करत त्यांचा तीव्र निषेध केला. यानंतर संबंध इतके बिघडले की भारताने कॅनडाचे काही वरिष्ठ राजनयिक हाकलून दिले आणि स्वतःचे उच्चायुक्त परत बोलावले.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US–Japan Trade Deal: जागतिक राजकारण ‘असे’ फिरले, पंतप्रधान मोदींच्या जपान दौऱ्यामुळे अमेरिकेने अब्जावधी रुपये झटक्यात गमावले
कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आले आणि परिस्थितीने नवे वळण घेतले. कार्नी यांनी पदभार स्वीकारताच भारताशी संबंध सुधारण्याचे संकेत दिले. अमेरिकेसोबतच्या त्यांच्या वाढत्या मतभेदांच्या पार्श्वभूमीवर, भारतासारख्या महत्त्वाच्या देशाशी सकारात्मक संबंध प्रस्थापित करण्याचे महत्त्व ओटावाला उमगले.
गुरुवारी कॅनडा सरकारने भारतात अनुभवी राजनयिक क्रिस्टोफर कुटर यांची उच्चायुक्त म्हणून नियुक्ती जाहीर केली. त्यानंतर लगेचच भारतानेही प्रत्युत्तरादाखल दिनेश पटनायक यांची कॅनडातील उच्चायुक्तपदी नियुक्ती घोषित केली. दोन्ही बाजूंनी एकाच वेळी उचललेले हे पाऊल हा केवळ औपचारिक निर्णय नसून, नव्या विश्वास आणि संवादाच्या प्रवासाची सुरुवात असल्याचे मानले जात आहे. कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनीही स्पष्ट केले की, “ही नियुक्ती ही भारतासोबतच्या संबंधांना टप्प्याटप्प्याने सुधारण्याच्या धोरणाचा भाग आहे.”
या वर्षी जून महिन्यात कॅनडात झालेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पंतप्रधान मार्क कार्नी यांची पहिली भेट झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी तणाव मिटवण्याची इच्छा व्यक्त केली आणि वरिष्ठ राजनयिक पुन्हा नियुक्त करण्याचा करार केला. आज त्या कराराचे फळ प्रत्यक्षात दिसू लागले आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : PM Modi In Japan : भारताला जपान प्रवासाचे मोठे फळ; 40 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक; AI, सेमीकंडक्टर आणि बुलेट ट्रेन चर्चेत
भारत आणि कॅनडा हे शिक्षण, व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रांत नैसर्गिक भागीदार आहेत. दोन्ही देशांतील भारतीय वंशाची मोठी लोकसंख्या हा संबंध अधिक मजबूत करणारा पूल आहे. मागील दहा महिन्यांतील कटुता विसरून आता संवाद, विश्वास आणि सहकार्याची नवी पहाट उगवण्याची चिन्हे दिसत आहेत. नव्या नियुक्त्यांमुळे व्यापार, विद्यार्थी देवाणघेवाण आणि संरक्षण सहकार्य या महत्त्वाच्या क्षेत्रांत प्रगती होईल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. विशेषतः जागतिक राजकारणात बदलत्या समीकरणांमुळे भारत-कॅनडा संबंध मजबूत होणे हे दोन्ही देशांसाठीच फायदेशीर ठरणार आहे.