India-China tensions rise ahead of Jaishankar's China visit for SCO summit China hints warning over Tibet.
India China tensions : भारत-चीन संबंध पुन्हा एकदा तणावाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. 14 आणि 15 जुलै रोजी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) परिषदेच्या निमित्ताने चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याआधीच चीनने तिबेटच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेत भारताला अप्रत्यक्ष इशारा दिला आहे.
बीजिंगमधील चिनी दूतावासाने रविवारी एक वक्तव्य करत स्पष्ट केलं की दलाई लामांच्या उत्तराधिकारीबाबत भारताचे मत आणि सार्वजनिक धोरण चीनसाठी अडथळा ठरत आहे. त्यांच्यानुसार, तिबेटशी संबंधित कोणतीही बाह्य टिप्पणी चीन सहन करणार नाही आणि हा मुद्दा चीनच्या अंतर्गत सुरक्षेचा भाग आहे.
या संपूर्ण वादाचं केंद्रबिंदू म्हणजे दलाई लामांचा संभाव्य उत्तराधिकारी. काही दिवसांपूर्वी दलाई लामांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांच्या उत्तराधिकारीची घोषणा तिबेटी बौद्ध ट्रस्टमार्फत केली जाईल. चीनने यावर आक्षेप घेत म्हटलं की, दलाई लामांचे पुनर्जन्म आणि त्यांचा उत्तराधिकारी ठरवण्याचा संपूर्ण अधिकार फक्त चीन सरकारकडेच असायला हवा. चीनचा दावा आहे की, तिबेट म्हणजे त्यांचा ‘शिजांग’ प्रांत असून, त्यावर संपूर्ण सार्वभौमत्व फक्त चीनचेच आहे. त्यामुळे कोणत्याही परदेशी शक्तीने यामध्ये हस्तक्षेप करणे हे चीनच्या अंतर्गत बाबींमध्ये ढवळाढवळ करण्यासारखे ठरेल.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पृथ्वीशिवाय जीवन? खगोलशास्त्रात मोठा शोध; ‘TOI-1846b’ या प्राचीन ग्रहावर पाणी असल्याचे संकेत
चिनी दूतावासाचे प्रवक्ते जिंग यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं की, भारतातील काही राजकीय आणि शैक्षणिक मंडळींनी तिबेटबाबत अयोग्य वक्तव्य केल्यामुळे भारत-चीन संबंध बिघडू शकतात. त्यांनी थेट आरोप करत म्हटलं, “शिजांग (तिबेट) भारत-चीन संबंधांमध्ये एक काटा आणि भारतासाठी एक बोझ बनला आहे. हे कार्ड पुन्हा पुन्हा खेळणं म्हणजे स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारण्यासारखं आहे.”
2020 मध्ये लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) झालेल्या संघर्षामुळे भारत-चीन संबंध आधीच अतिशय तणावपूर्ण झाले होते. यानंतर गेल्या वर्षी दोन्ही देशांनी काही भागांमधून सैन्य मागे घेतले असले, तरी परस्पर अविश्वास आणि सीमा वाद कायम आहेत. अशा पार्श्वभूमीवर जयशंकर यांची ही चीन यात्रा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
जयशंकर यांचा हा दौरा शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या परिषदेच्या निमित्ताने होत आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्यासह जयशंकर यांची द्विपक्षीय भेट होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सीमावाद, व्यापार, दहशतवाद आणि तिबेटसंदर्भातील विषयांवर गंभीर चर्चा होऊ शकते.
भारताने आजवर तिबेटबाबत सावध भूमिका घेतली आहे. दलाई लामांना भारतात आश्रय देण्यात आला असला, तरी भारत सरकारने अधिकृतपणे तिबेटच्या स्वातंत्र्याचा उल्लेख केलेला नाही. मात्र, चीनचा आक्रमक सूर आणि त्याचा दलाई लामांच्या उत्तराधिकारीबाबतचा हस्तक्षेप भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ब्राझीलने भारताला दिला मोठा झटका! ‘Akash Missile System’ची खरेदी रद्द; काय आहे कारण?
चीनने दिलेल्या इशाऱ्यानंतर जयशंकर यांची भेट आणखीच संवेदनशील बनली आहे. या पार्श्वभूमीवर भारताला तिबेटसंबंधी आपली धोरणे पुन्हा एकदा नीट ठरवावी लागतील, कारण चीनने स्पष्टपणे सांगितले आहे – “शिजांग आमचा अंतर्गत मुद्दा आहे, बाहेरच्यांनी तोंड घालू नये.”