ब्राझीलने भारताला मोठा झटका दिला! 'आकाश' क्षेपणास्त्र प्रणाली खरेदी रद्द; युरोपीय EMADS प्रणालीवर विश्वास ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Brazil cancels Akash deal : भारताच्या संरक्षण क्षेत्रासाठी मोठी निराशाजनक बातमी समोर आली आहे. लॅटिन अमेरिकेतील महत्त्वाचा देश ब्राझील याने भारताची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी स्वदेशी ‘आकाश’ हवाई संरक्षण प्रणाली खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने भारताच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला जोरदार धक्का बसला आहे.
ब्राझीलच्या संरक्षण मंत्रालयाने भारतासोबत ‘आकाश’ प्रणालीच्या खरेदीसंबंधी सुरू असलेली चर्चा अचानक थांबवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ब्राझीलने या निर्णयामागे ‘आकाश’ प्रणालीची कामगिरी अपुरी असल्याचे कारण दिले आहे. विशेषतः हाय-स्पीड आणि कमी उंचीवरून होणाऱ्या हल्ल्यांना तोंड देण्यात ‘आकाश’ प्रणाली अपयशी ठरत असल्याचे ब्राझीलने स्पष्ट केले आहे.
आजच्या काळात युद्धाच्या पद्धतीत झपाट्याने बदल होत आहेत. ड्रोन हल्ले, हायब्रिड युद्ध, स्मार्ट बॉम्ब यांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा स्थितीत ब्राझीलच्या लष्कराला वाटते की, भारताची ‘आकाश’ प्रणाली हे अत्याधुनिक धोक्यांना तोंड देण्यासाठी अद्याप सक्षम नाही. त्यामुळेच त्यांनी युरोपातील सुप्रसिद्ध MBDA कंपनीच्या Enhanced Modular Air Defence Solutions (EMADS) प्रणालीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 300 वर्षांपूर्वी गोव्यातून निघालेलं पोर्तुगीज जहाज समुद्रात बुडालं; आता सापडला 12 अब्ज रुपयांचा खजिना
MBDA ही कंपनी युरोपातील एक प्रसिद्ध संरक्षण तंत्रज्ञान पुरवठादार आहे. त्यांनी विकसित केलेली EMADS प्रणाली NATO सदस्य राष्ट्रांत वापरली जाते आणि ती अतिशय विश्वासार्ह मानली जाते. ब्राझीलच्या माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्राझील आणि MBDA यांच्यात सुमारे 1 अब्ज अमेरिकन डॉलर्सचा (सुमारे 4.7 अब्ज रिंगिट) करार होण्याची शक्यता आहे. हा करार लॅटिन अमेरिका खंडातील आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई संरक्षण करार ठरू शकतो.
भारताच्या संरक्षण निर्यात धोरणात ‘आकाश’ ही एक प्रमुख प्रणाली मानली जात होती. ती DRDO आणि BEL यांनी विकसित केलेली असून, भारतीय लष्करातही ती वापरात आहे. भारताने ही प्रणाली अनेक देशांना विकण्याचा प्रचार केला होता, त्यात ब्राझील एक महत्त्वाचा संभाव्य खरेदीदार होता. मात्र, आता ब्राझीलने या करारावर पाणी फेरल्यामुळे भारताच्या संरक्षण उत्पादनांच्या आंतरराष्ट्रीय विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
‘आत्मनिर्भर भारत’ हे केवळ घोषणाबाजी न राहता, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक दर्जा गाठण्याचे उद्दिष्ट ठरले आहे. मात्र, ब्राझीलच्या या निर्णयामुळे भारतीय संरक्षण उत्पादनांची प्रत आणि प्रभावीता यांच्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे. कारण परकीय लष्करांना भारताच्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवण्यासाठी अद्याप प्रयत्नांची आवश्यकता आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : तुर्कीची S-400 पाकिस्तानला विकण्याची योजना; काय असणार अमेरिका आणि इस्रायलची भूमिका?
ब्राझीलचा निर्णय भारतासाठी आत्मपरीक्षणाचा क्षण आहे. ‘आकाश’ प्रणालीवर संशोधन वाढवून ती आंतरराष्ट्रीय निकषांवर अधिक सक्षम बनवण्याची गरज आहे. भारतीय संरक्षण निर्यात धोरणासाठी हे आव्हान असले, तरी भविष्यात सुधारणा करून भारत परत मैदानात उतरेल, हीच अपेक्षा.