India's rise as a submarine power from INS Arihant to Arighat with secret Russian support
India nuclear submarine program : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारताच्या दौऱ्यावर येणार असून, त्यांनी भारताला अत्याधुनिक सुखोई-५७ लढाऊ विमाने देण्याची तयारी दर्शवली आहे. भारत-रशिया संबंध हा केवळ संरक्षण व्यवहारांचा भाग नसून, तो दशकानुदशकांचा विश्वास आणि सहकार्याचा दुवा आहे. विशेषतः भारत अणु पाणबुडी महासत्ता बनत असताना, रशियाचे योगदान निर्णायक ठरले.
१९७१ च्या भारत-पाक युद्धानंतर हिंदी महासागरातील रणनीतिक चित्र बदलले. अमेरिकेच्या ‘यूएसएस एंटरप्राइज’ तैनातीमुळे भारताला जाणवले, की जमीन आणि आकाशपुरतेच नव्हे, तर समुद्रातही स्वावलंबन आवश्यक आहे. याच उद्देशाने भारताने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा शोध घेतला. पण अमेरिका, फ्रान्स, ब्रिटनसारख्या पश्चिमी राष्ट्रांनी भारताला मदत करण्यास नकार दिला. आंतरराष्ट्रीय धोरणांमुळे भारताला तांत्रिक बहिष्काराचा सामना करावा लागला.
पण अशा कठीण वेळेस सोव्हिएत युनियन (रशिया) भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला. १९८८ मध्ये भारताने रशियाकडून ‘चार्ली क्लास’ अणु पाणबुडी के-४३ भाड्याने घेतली, जिला ‘INS चक्र’ हे नाव देण्यात आले. ती केवळ एक युद्धनौका नव्हती, तर तरंगणारे विद्यापीठ होती. भारतीय नौदल अधिकारी, अभियंते आणि शास्त्रज्ञांनी तिच्या प्रत्येक यंत्रणेचे सखोल ज्ञान मिळवले. या प्रशिक्षणानेच ‘INS अरिहंत’सारख्या स्वदेशी अणु पाणबुडीच्या प्रकल्पास पाया दिला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : VIDEO VIRAL : लाल समुद्रात टायटॅनिकसारखी दुर्घटना! हुथी बंडखोरांचा जीवघेणा हल्ला; जहाजाचे दोन तुकडे, 3 ठार
INS चक्र प्रकल्पादरम्यान काही तांत्रिक अडचणी आल्या, तरी भारताला मिळालेला अनुभव अमूल्य ठरला. भारताने नंतर ‘अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजिकल व्हेसेल’ (ATV) प्रकल्प सुरू केला. हा गुप्त प्रकल्प भारताच्या अणु पाणबुडी स्वप्नाचा आत्मा ठरला. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) आणि रशियाच्या मदतीने भारतीय वैज्ञानिकांनी लहान अणुभट्टी डिझाइन करण्याचे कौशल्य आत्मसात केले. रशियाने हायड्रो अकॉस्टिक्स, नॉइज रिडक्शन, टॉर्पेडो सिस्टिमसारख्या विविध बाबींमध्ये मदत केली.
INS अरिहंत. २००९ मध्ये ती समुद्रात उतरली आणि २०१६ मध्ये पूर्णतः कार्यरत झाली. ही बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी (SSBN) भारताच्या अणु त्रिकोणाचा महत्त्वाचा भाग ठरली. भारत आता जमिनीवरून, आकाशातून आणि समुद्रातूनही अणुहल्ला करण्यास सक्षम झाला. यानंतर २०१२ मध्ये भारताने पुन्हा एकदा रशियाकडून INS चक्र-२ भाड्याने घेतली. अकुला-II श्रेणीतील पाणबुडी. ही पुढील पिढीची शक्तिशाली नौका होती, जिला INS अरिघाटसारख्या नव्या पाणबुडी प्रकल्पासाठी एक टप्पा मानले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : गोलान हाइट्सच्या बदल्यात सत्ता राखणार? UAE मध्ये सीरियाचे अल-शारा आणि इस्रायली NSAची गोपनीय बैठक
आज भारत पाणबुडी तंत्रज्ञानात स्वावलंबी होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. ही कथा केवळ अणुशक्ती किंवा नौदल यशाची नाही, तर भारतीय विज्ञान, संयम, आणि धोरणात्मक दूरदृष्टीची साक्ष आहे. जगाने पाठ फिरवली असताना, रशिया खरा मित्र ठरला. भारताच्या या यशामागे जगाला प्रेरणा देणारे स्वप्न आणि दीर्घकालीन संघर्षाची छाया आहे, जी भविष्यातील अनेक स्वप्नांना दिशा देईल.