गोलान हाइट्सच्या बदल्यात सत्ता राखणार? UAE मध्ये सीरियाचे अल-शारा आणि इस्रायली NSAची गोपनीय बैठक ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
Al-Shar’a UAE meeting : सीरियाचे नवे राजकीय नेते अल-शारा यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार त्झाची हनेग्बी यांच्याशी गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली असून, या बैठकीमुळे पश्चिम आशियातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. लेबनीज वृत्तसंस्था ‘अल मायादीन’ने दिलेल्या वृत्तानुसार, ही उच्चस्तरीय चर्चा यूएईचे अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद यांच्या उपस्थितीत झाली.
वृत्तांनुसार, या बैठकीत अल-शारा यांनी इस्रायलशी संबंध सामान्य करण्यावर विचारमंथन केले. विशेष म्हणजे, गोलान हाइट्सवर इस्रायली ताब्याबाबत सवलती देण्याच्या अटीवर ही चर्चा झाल्याचा दावा करण्यात आला आहे. ही बाब सीरियासाठी निर्णायक ठरू शकते, कारण अल-शाराला सत्तेचे बळकटीकरण आणि पश्चिमी राष्ट्रांकडून मान्यता मिळवण्यासाठी अशा निर्णयांची गरज भासत असल्याचे राजनैतिक वर्तुळात बोलले जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अबू धाबी विमानतळावर अल-शारा आणि हनेग्बी यांच्या विमानांचे आगमन जवळजवळ एकाच वेळी झाले. ही गोष्टच या गुप्त भेटीचे संकेत देते. अमेरिकेच्या अध्यक्षांच्या मध्यस्थीमुळे या प्रकारच्या बैठका घडून येत असल्याचे सांगितले जात आहे. याद्वारे अमेरिका अब्राहम कराराच्या विस्ताराचा प्रयत्न करत असल्याचेही निरीक्षण आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : पाकिस्तानशी निष्ठा असूनही आमच्यावर अन्याय! ख्रिश्चन कुटुंबाची हाक; बिलावल भुट्टोंकडे पत्रात व्यक्त केला संताप
या बैठकीचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, अल-शाराने आपल्या सत्तेला आंतरराष्ट्रीय पाठिंबा मिळावा यासाठी गोलान हाइट्सवरील सवलतीची तयारी दर्शवली. सीरियाच्या दृष्टीने हा भूभाग अत्यंत संवेदनशील असून, 1967 च्या युद्धानंतर इस्रायलने हा भाग आपल्या ताब्यात घेतला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर आजही या ताब्यावर मोठा वाद आहे.
याशिवाय, बैठकीत दक्षिण सीरियात तीन निशस्त्रीकरण क्षेत्रांची स्थापना करण्यावर देखील चर्चा झाल्याचे वृत्त आहे. दारा, कुनेइत्रा आणि अस-सुवैदा या प्रांतांमध्ये जड शस्त्रास्त्रांचे हटवणे, आणि स्थानिक सुरक्षा दलांना केवळ हलक्या शस्त्रांसह ठेवणे, असा या कराराचा भाग असू शकतो.
दुसरीकडे, इस्रायलने मात्र ही बातमी फेटाळून लावली आहे. त्यांनी म्हटले आहे की, हनेग्बी सध्या पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या शिष्टमंडळात सहभागी होऊन अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, इस्रायलने सीरिया व इस्रायलमधील संबंध सामान्य करण्यासाठी सुरू असलेल्या संभाव्य चर्चांना पूर्णपणे नाकारलेले नाही.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 11 वर्षांनी MH17 दुर्घटनेचं गूढ उलगडलं; रशिया दोषी, युरोपियन न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
ही संपूर्ण घटना पश्चिम आशियातील नाजूक राजकारणासाठी एक मोठी हलचल ठरू शकते. यामुळे सीरियामधील सत्ता स्थैर्य, इस्रायलच्या धोरणांमध्ये बदल आणि अमेरिका-यूएईच्या भूमिकांवरही परिणाम होऊ शकतो. या घडामोडींचा पुढील काळात अधिक उलगडा होण्याची शक्यता आहे.